पुणे: गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता, असे विधान करुन श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेपासून संभाजी भिडे सातत्याने चर्चेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वारीला जाण्यासाठी संचेती हॉस्पिटलजवळ शेकडो धारकरी जमले होते. यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी संभाजी भिडेही उपस्थित होते. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांना तासभर मार्गदर्शन केले. यावेळी भिडे यांनी मनुस्मृतीतील काही अध्याय ऐकवले. 


सर्व मानव हे प्राणी आहेत. पण धर्माचरण करणाऱ्या मानवात आणि प्राण्यात फरक आहे. देवाने माणसाला स्वत:ची क्षमता जाणून घेण्याची शक्ती दिली आहे आणि माणूस केवळ धर्मामुळेच स्वत:च्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. पण मनूने या दोन्ही संतांच्या पुढचा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. धर्मच देशाचं रक्षण करू शकतो, हे मनूने दाखवून दिले आहे. त्यामुळे गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून आपल्या हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता, असे भिडे यांनी सांगितले.