राम मंदिर आणि पुतळ्यांच्या राजकारणामुळे भाजपचा पराभव- संजय काकडे
मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा विकास हा पक्षाचा मुख्य अजेंडा होता.
पुणे: राजस्थान व छत्तीसगढमध्ये आमचा पराभव होऊ शकतो, याचा आम्हाला अंदाज होता. मात्र, मध्य प्रदेशातील निकाल खरोखरच अनपेक्षित आहे, असे भाजपचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी म्हटले. मात्र, या पराभवाला भाजपच्या भूमिकेत झालेला बदल कारणीभूत आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा विकास हा पक्षाचा मुख्य अजेंडा होता. मात्र, राम मंदिर, पुतळे आणि नामांतराच्या राजकारणाच्या नादात विकासाचा अजेंडा मागे पडला. यामुळेच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला, असे काकडे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली. आजचे निकाल म्हणजे काँग्रेसचा विजय आहे, असे मी म्हणणार नाही. हा लोकांचा रोष आहे. भाजपने नेहमीच मित्रपक्षांनी कमी लेखले, त्यांना वाईट वागणूक दिली. त्यामुळे भाजपला आता केवळ चिंतनच नव्हे तर आत्मचिंतन करायची गरज असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपला फटकारले. या निकालांच्या माध्यमातून जनतेने आम्ही कोणाचीही मग्रुरी खपवून घेणार नाही, असा संदेश भाजपला दिल्याचे त्यांनी म्हटले.
याशिवाय काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी अहंकारामुळेच राजस्थानमधून भाजपची सत्ता गेल्याचे सांगितले. काँग्रेसमुक्तीची भाषा करणारेच आता मुक्त होतील, अशी टीका त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीचे आतापर्यंत हाती आलेले कल पाहता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या प्रमुख राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झालेय.
या निकालांनंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाला उधाण आले आहे. काँग्रेसने सर्व ठिकाणी जोरदार कमबॅक केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हे निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणार आहेत. तर दुसरीकडे या निकालांमुळे भाजपला आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे.