पुणे: देशातील काही लोकांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. परंतु, मला एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मंदिरात गेल्यासारखंच वाटेल, असे विधान अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. ते रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी दुष्काळ, दिल्लीतील शेतकरी मोर्चा आणि राम मंदिर याविषयी आपले मत मांडले. त्यांनी म्हटले की, यंदा राज्यात दुष्काळ आहे, मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. नाइलाजाने गावाकडील लोक आज शहरात येत आहेत, ती भिकारी नाहीत. त्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका, असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच दिल्लीतील मोर्चा हा शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजा पूर्ण होत नसल्यामुळे काढल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांसाठी एकटं सरकार सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात पुढे करायला हवा, असे पाटेकर यांनी सांगितले. 


यावेळी पत्रकारांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून पाटेकर यांना छेडले. आपल्याकडे राम मंदिरावर चर्चा होते, मात्र दुष्काळावर चर्चा होत नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना नाना पाटेकर यांनी म्हटले की, कुणी काय करावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला जे करावेसे वाटते ते मी करतो. गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल. त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधयाचे असेल तर जरुर बांधा, तो त्यांचा निर्णय आहे, असे नाना पाटेकर यांनी सांगितले.