डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील तीन आरोपींना जामीन
सीबीआयला आरोपपत्र सादर करण्यात अपयश
पुणे: अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील तीन आरोपींना शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित देगावकर अशी या जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास करत असलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) ९० दिवसांच्या मुदतीत या तिघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात अपयश आले. त्यामुळे सत्र न्यायालयाने या तीन आरोपींना जामीन मंजूर केला.
मात्र, या तिन्ही आरोपींची तुर्तास सुटका होणे अवघड आहे. या तिघांपैकी अमोल काळे हा कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित असून विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) त्याची चौकशी सुरु आहे. तर राजेश बंगेरा आणि अमित देगावकर हेदेखील पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असून कर्नाटक एसआयटीकडून त्यांची चौकशी केली जात आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्ष उलटल्यानंतरही पोलिसांना अजूनही या प्रकरणाचा अंतिम छडा लावता आलेला नाही. दरम्यान, गेल्या काही काळात झालेल्या पोलीस तपासात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे एकाच टोळीचा हात असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, याबाबत ठोस पुरावे पोलिसांना सादर करता आले नाहीत.