गणपती विसर्जनादरम्यान सहा जणांचा बुडून मृत्यू
या उत्साही वातावरणाला काही भाविकांच्या मृत्यूमुळे गालबोट लागले आहे.
सातारा: महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणरायाला रविवारी राज्यभरात भावपूर्ण निरोप दिला जात आहे. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर आज सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसत आहेत. एकूणच सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या उत्साही वातावरणाला काही भाविकांच्या मृत्यूमुळे गालबोट लागले आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राज्यभरात विविध ठिकाणी गणपती विसर्जनादरम्यान सहा भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी तिघेजण कृष्णा नदीच्या पात्रात बुडाले. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही हे तिघेजण नदीच्या पात्रात खोलवर गेले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तिघेजण बुडायला लागले. यावेळी ग्रामस्थांनी एकाला वाचवले. मात्र, अन्य दोघांचा मृत्यू झाला आहे. तर भंडारा जिल्ह्यातही विसर्जनादरम्यान दोघांचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय, शिर्डीत एक आणि संगमनेरच्या प्रवरा नदीत एकजण बुडाला. तर जळगावच्या मेहरूण तलावातही एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.