सातारा: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपली उमेदवारी शाबूत ठेवण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी उदयनराजेंचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असणारे शिवेंद्रराजेसिंह भोसले, रामराजे निंबाळकर आणि शशिकांत शिंदे बारामतीमधील पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी पवार आणि अन्य नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. राजकीय तज्ज्ञांच्या मते उदयनराजेंची लोकसभेची उमेदवारी कापण्यासाठीच ही भेट झाल्याचा अंदाज आहे. उदयनराजे भोसले यांच्याऐवजी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी या नेत्यांनी आग्रह धरला. त्यामुळे आता शरद पवार याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


यापूर्वी उदयनराजेंनी शरद पवारांची भेट घेतली तेव्हादेखील दोन्ही नेत्यांमध्ये खासगीत चर्चा झाली. त्यावेळीही राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी वेगळ्या बाजूला आणि खासदार उदयनराजे वेगळ्या बाजूला अशी परिस्थिती सातारा विश्रामगृहात पाहायला मिळाली होती. 


शरद पवारांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी पत्रकारांनी दिलेली प्रतिक्रियाही बरेच काही सांगून जाणारी होती. कोणीही फसवाफसवी केली तर आम्ही बघून घेऊ, असा इशाराच यावेळी उदयनराजेंनी दिला होता.