कोल्हापूर: कोरोना व्हायरसच्या Coronavirus वाढत्या प्रादुर्भावामुळे आता कोल्हापूर जिल्हाही लॉकडाऊन करण्याचा Complete Lockdown In Kolhapur  निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. त्यानुसार, येत्या सोमवारपासून आठवडाभरासाठी कोल्हापूर जिल्हयात लॉकडाऊन असेल. या काळात केवळ औषधे आणि दूध पुरवठा एवढ्याच सेवा सुरु राहतील. उर्वरित सर्व व्यवहार आणि कामकाज बंद राहील, असे सतेज पाटील यांनी सांगितले. ठाणे आणि पुण्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्हाही लॉकडाऊन झाल्याने राज्य सरकारच्या 'मिशन बिगीन अगेन'चा फज्जा उडणार का, अशी शंका उत्त्पन्न झाली आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे २०६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १६५० इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. सतेज पाटील यांनी सर्वांची मते विचारात घेतली. त्यात काही लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनला विरोध केला तर काहींनी लॉकडाऊनसाठी आग्रह धरला होता. 

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. एक्टिव्ह रुग्णसंख्येच्याबाबतीतल पुण्याने मुंबईलाही मागे टाकले आहे. त्यामुळे आता पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच बारामती आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी कडक लॉकडाऊन राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. 


यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बिगीन अगेनची घोषणा केली होती. एकदा सुरु केलेल्या गोष्टी पुन्हा बंद करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला लॉकडाऊनचे अधिकार पुन्हा देऊ केले होते. यामुळे अर्थव्यवस्था आणि उद्योगधंदे पुन्हा अडचणीत आले आहेत. यावरुन विरोधक महाविकासआघाडी सरकारला सातत्याने लक्ष करत आहेत.