सांगली: राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्यामुळे लवकरच सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे द्यायला होकार दर्शविला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकच बसणार, हे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यात एक भावूक प्रसंग घडला. सांगलीतील संजय सावंत आणि रुपाली सावंत हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते. या दाम्पत्याची आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. 


सत्तास्थापनेचा १७ नोव्हेंबरचा मुहूर्तही टळणार? पवारांचे संकेत


त्यावेळी संजय सावंत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभं करा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभे करतो, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. या प्रसंगाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत केंद्रे उभारण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. तुम्ही खचून जाऊ नका. वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेन, असेही उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. 


मदत केंद्रे उभारा... शेतकऱ्यांच्या बांधावरून पक्षप्रमुखांचे शिवसैनिकांना आदेश


शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र मदतीबाबत ठोस कुठलाही पर्याय समोर आलेला नाही. त्यामुळे राज्यपालांसोबत महाशिवआघाडीचे नेते याबाबत चर्चा करणार आहेत.