मदत केंद्रे उभारा... शेतकऱ्यांच्या बांधावरून पक्षप्रमुखांचे शिवसैनिकांना आदेश

वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेन - उद्धव ठाकरे

Updated: Nov 15, 2019, 07:12 PM IST
मदत केंद्रे उभारा... शेतकऱ्यांच्या बांधावरून पक्षप्रमुखांचे शिवसैनिकांना आदेश   title=

सांगली / सातारा : राज्यामध्ये सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू असताना याच्या केंद्रस्थानी असलेले दोन नेते आज शेतकऱ्यांच्या बांधावर दिसले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सांगली आणि सातारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील डाळिंब पीक पूर्णपणे उध्दवस्त झालंय. नुकसानग्रस्त भागाची पाहणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.  सांगलीतल्या विटा इथल्या डाळिंब उत्पादक शेतकरी श्रीराम लोटके यांच्या शेतीला भेट देवून त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. 


उद्धव ठाकरे दुष्काळ दौऱ्यावर

सांगलीनंतर उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यातील मायणी इथं जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली. तुम्ही खचून जाऊ नका. आपण तातडीनं शेतकरी मदत केंद्रे सुरू करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेन, असा विश्वासही शिवसेना पक्षप्रमुखांनी शेतकऱ्यांना दिला.  

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र मदतीबाबत ठोस कुठलाही पर्याय समोर आलेला नाही. त्यामुळे राज्यपालांसोबत महाशिवआघाडीचे नेते याबाबत चर्चा करणार आहेत.