अमित जोशी, झी मीडिया, पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट दिली. यावेळी त्यांनी गडावरील राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले.  तब्बल २० वर्षांनी राज्यपालांनी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांच्या या शिवनेरी दौऱ्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. जुन्नर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने या दौऱ्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी तयारी करण्यात आली होती. तसेच किल्ल्यावर व मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. काल पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कौन्सिल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई हे उपस्थित होते.