अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: धरणक्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून त्यात ८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.धरणसाखळी तील सर्वात खालचं तसंच छोटं असलेलं खडकवासला धरण १०० टक्के भरलं असून त्यातून याक्षणी 2568 क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यांत मिळून 25.33 टीएमसी म्हणजे 86.89 टक्के साठा झालाय. अर्थात गेल्या वर्षी आजच्या तारखेला हा साठा 29.15 टीएमसी इतका होता. म्हणजे धरणं 100 टक्के भरली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणं भरायला विलंब लागत असला तरी सध्या सुरू असलेला पाऊस पुढील काही दिवस कायम राहिला तर गणपती बाप्पाच्या अगमनापूर्वी चारही धरणं 100 टक्के भरतील अशी अपेक्षा आहे.


आजचा पाणीसाठा
खडकवासला 1.97 टीएमसी / 100%
पानशेत 10.32 टीएमसी /  96.91 %
वरसगाव 10.58 टीएमसी / 82.50 %
टेमघर 2.46 टीएमसी / 66.33 %
एकूण साठा 25.33 टीएमसी/ 86.89 %


तर दुसरीकडे मुंबईतही गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या मुंबईत अधूनमधून पाऊस पडत असला, तरी धरणक्षेत्रात मात्र चांगलाच पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या १२ दिवसात पाणीसाठ्यात दुप्पट वाढ झाली आहे. हा पाणीसाठा पुढील नऊ महिने मुंबईकरांची तहान भागवेल इतका आहे.