पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कडक करा-अजित पवार
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे नियम आणखी कडक करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.अजित पवार यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती घेऊन योग्य ते उपाय सुचवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी करणं अतिशय गरजेचं आहे. या भागात गर्दी होऊ नये, यासाठी शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येऊ नयेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
टेन्शन कायम; धारावीत कोरोनाचे २१ नवे रुग्ण
कन्टेंन्मेट झोनमध्ये पोलीस प्रशासनाने लॉकडाऊनचे कडक निर्बंध राबवावेत. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना वेळेत आणि चांगल्या दर्जाचं भोजन मिळावं, शहरातील रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचं संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी केले आहेत.
प्रशासनाकडून सांगण्यात आलेले नियम, सूचना पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलंय.
आरोग्यसेवा तत्पर आणि सक्षम होण्यासाठी ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामं गतीने पूर्ण करावीत, रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार करण्याचं काटेकोर नियोजन करावं, इतर जिल्ह्यातील मजुरांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घेण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.