Loksabha Election 2024 : `हे बरोबर नाही` शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणाले
Loksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या `त्या` वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
Loksabha Election 2024 : भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल अजित पवार यांनी अखेर मौन सोडलं. 'आम्हाला बारामती शरद पवारांचा पराभव करायचा आहे', असं चंद्रकांत पाटील चुटकी वाजवत म्हणाले होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अजित पवार यांनी त्याविषयीची नाराजी व्यक्त केली. बारामतीतील चुरशीच्या निवडणुकीत काय होणार याविषयीची चिंता महायुतीच्या नेत्यांना लागून आहे. बारामतीत पराभव देखील ओढवू शकतो, अशी भीती कार्यकर्त्यांसह बड्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच पवारांकडून चंद्रकांत पाटील किंबहुना भाजप नेत्यांविषयीची खदखद बाहेर पडताना दिसत आहे.
दरम्यान, अजित पवार यांनीही पाटील यांच्या या वक्तव्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया देत त्यांनी जे विधान केलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता, तथ्य नव्हतं असं म्हटलं. 'आम्ही चंद्रकांत दादांना म्हटलं तुम्ही पुण्यात काम बघा... आमचे कार्यकर्ते बारामतीत काम बघतील. चंद्रकांत पाटील यांनी असं बोलायला नको होतं, जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता हे बरोबर नाही..', असं म्हणत अजित पवारांनी नाराजीचा सूर आळवला.
हेसुद्धा वाचा : धोका! वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या पुडीतील भजी, वडे खाताय?
चंद्रकांत पाटील बारामतीच्या प्रचारात दिसत असल्याबद्दल ते सध्या काय करतात अशा आशयाची बातमी झी 24 तास न गेल्या आठवड्यात केली होती. त्या बातमीतील प्रश्नाचे उत्तर आज मिळाल आहे. शरद पवारांविषयी च्या वक्तव्यानंतर तुम्ही बारामतीत लक्ष घालू नका पुण्याचं बघा असं आपणच त्यांना सांगितल्याच अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.
अजित पवार यांनी एकिकडे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून खदखद व्यक्त केलेली असतानाच दुसरीकडे त्यांनी 'सिट निवडून येईल याची खात्री आहे', असं वक्तव्य करत बारामतीतील जागेबाबत विश्वास व्यक्त केला. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा फटका आपल्याला निवडणुकीतही बसू शकतो असंही वक्तव्य केल्याची चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, त्याबाबत कोणतीही स्पष्टोक्ती नाही. तेव्हा आता पाटील आणि पवार यांच्यातील हे मतभेद दूर होणार का? आणि अजित पवारांच्या वक्तव्यावर पाटील काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.