मोठी बातमी: शेखर गायकवाड यांची पुण्याच्या आयुक्तपदावरुन बदली
पीएमआरडीएच्या विक्रम कुमार यांच्याकडे आता पुण्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.
अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: महाविकासआघाडी सरकारकडून शनिवारी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या IAS बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शेखर गायकवाड यांचा समावेश आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. तर पीएमआरडीएच्या विक्रम कुमार यांच्याकडे आता पुण्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.
शेखर गायकवाड यांची २२ जानेवारीला पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत महापौर आणि आयुक्तांमध्ये मतभिन्नता होती. परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोवर निर्बंध शिथिल करू नये, अशी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भूमिका होती. तथापि आयुक्तांनी निर्बंध उठवत ९७ टक्के शहर ४ मे रोजी खुले केले होते. यानंतर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. एकंदरीतच ही सर्व परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्यामुळे शेखर गायकवाड यांची पुण्याच्या आयुक्तपदावरुन गच्छंती झाल्याचे समजते.
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे:
* सौरभ राव यांची साखर आयुक्तलयातून पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी (विशेष ड्युटी) नियुक्ती करण्यात आली आहे.
* शेखर गायकवाड यांची पुण्याच्या आयुक्तपदावरुन पुण्याच्या साखर आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
* विक्रम कुमार यांना पीएमआरडीएच्या सीईओपदावरुन हटवून त्यांची नियुक्ती पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.
* पुण्यातील कृषी विभागाचे आयुक्त असणाऱ्या सुहास दिवासे यांची पीएमआरडीएच्या सीईओपदी नियुक्त झाली आहे.
* जितेंद्र दुडी यांची सांगली जिल्हापरिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.