positivity rate वाढला, पुणेकरांनो काळजी घ्या... अन्यथा...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे संकेत
पुणे : पुण्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच पुण्यातील २६ टक्के नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले नाहीत. कोरोना नियमाची अनेक ठिकाणी पायमल्ली होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना आज निर्वाणीचा इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, पुण्यात आज ६८१९ पैकी ४११ रुग्णांचा अहवाल positive आला. हा दर १८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ४११ पैकी ३६ जणांनी कोरोना लस घेतली नव्हती.
ओमायक्रॉन (omicron) वेगाने येतोय. १०५ देशात याचा फैलाव झाला आहे. देशातल्या २३ राज्यात आणि महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण संख्या वाढत आहे हे निश्चित. त्यामुळे काळजीचे वातावरण आहे.
उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून ३८ जिल्ह्यांसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. तर, रुग्ण संख्या वाढणाऱ्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचा याचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, कालपासून मुलांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नववी आणि दहावीचे वर्ग ऑनलाईन चालू राहणार आहेत. तसेच, ज्यांचे लसीचे दोन डोस राहिले आहेत. त्यांना ते डोस घ्यावेच लागतील.
राज्यातील जनतेने आपले १०० टक्के vaxination करून घ्यावे. ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले नसतील त्यांना पुण्यात प्रवेश बंदी करण्यात येईल. तसेच त्यांना हॉटेल, रेस्टॉरंट येथे प्रवेश देण्यात येणार नाही. कापडी मास्क वापरण्याऐवजी N ९५ मास्क वापरावे.
ज्या नागरिकांनी मास्क घातला नसेल अशाना ५०० रुपये तर मास्क न घालता रस्त्यावर थुकणाऱ्यांकडून १००० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. जनतेनं नियमांचे पालन करून सहकार्य करावं असे आवाहनही त्यांनी केले.