पुण्यात बिल्डरच्या मुलावर गुंडांचा बेछूट गोळीबार
हांडेवाडी ते हडपसर असा दुचाकीवर थरारक पाठलाग करत चार गोळ्या झाडल्या.
पुणे: पुण्यातील हडपसर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री गुंडांच्या टोळक्याने एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार केल्याची घटना घडली. हांडेवाडी रोड येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक बिनावत यांचा मुलगा निलेश बिनावत शुक्रवारी रात्री लॅंड क्रुझर कारमधून प्रवास करत होता. हल्लेखोरांनी निलेशच्या लॅँड क्रूझरचा हांडेवाडी ते हडपसर असा दुचाकीवर थरारक पाठलाग करत चार गोळ्या झाडल्या. मात्र, निलेशने प्रसंगावधान राखत आपली गाडी थेट हडपसर पोलीस ठाण्यात नेली. त्यामुळे हल्लेखोरांनी पळ काढला.
प्राथमिक माहितीनुसार, टिपू पठाण या गुंडाने आपल्या साथीदारांसह हा हल्ला केला. जवळपास दहा ते बारा जण दुचाकीवरून निलेशचा पाठलाग करत होते. त्यांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी चार गोळ्या निलेशच्या जवळून गेल्या. मात्र, सुदैवाने एकही गोळी निलेशला लागली नाही. त्याच्यासोबत गाडीत असलेल्या मित्राला किरकोळ दुखापत झाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.