Pune School Bus Accident Video: पुण्यामध्ये एका स्कूल बसचा अपघात झाला आहे. वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची बस झाडाला आदळली आहे. बसमधले काही विद्यार्थी जखमी झाले. खासगी रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. 


जोरात आवाज अन् किंकाळ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला. सकाळीच्या वेळी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला. या अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या सीसीटीव्हीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर अत्यंत वेगाने स्कूल बस येऊन धडकताना दिसते. बसचा दरवाजाकडचा भाग म्हणजेच डावा भाग झाडाला धडकल्यानंतर व्हिडीओमध्ये बसची डॅशबोर्डची काच उडून समोर पडताना दिसते. बसचा अपघात झाल्यानंतर बसमधील मुलांचा आरडाओरड आणि किंकाळ्याही ऐकू आल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने या स्कूल बसमधील मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही स्थानिक खिडकीमधून डोकावून रडत असलेल्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करताना 'शांत व्हा, शांत व्हा. भिऊ नका. काही झालेलं नाही,' अशा शब्दांत धीर देत होते.


आरटीओचं नियंत्रण नाही


सुदैवाने या अपघातामध्ये जिवितहानी झालेली नाही. मात्र पैसे मोजूनही मुलांच्या सुरक्षेबद्दल असा बेजबाबदारपणा पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या बसेसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालक वर्गाकडून केला जात आहे. आरटीओने अशा बसेसवर कारवाई करण्याची गरज असते. मात्र पुणे आरटीओचं अशा बसेसवर कोणत्याही पद्धतीचं नियंत्रण नसल्याचा आरोप केला जात आहे. अनेकदा मार्यादेपेक्षा अधिक मुलं बसमधून नेली जातात. तसेच स्कूल बसऐवजी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी इतर वाहनांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 



अनेकदा उपस्थित होतो हा मुद्दा पण...


या व्हिडीओमध्ये बस किती वेगात होती याचा अंदाज सहज बांधता येत आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र पालकांनी वारंवार अशापद्धतीच्या घटना घडत असल्याने स्कूल बसविरोधात ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. अनेकदा पालक संघटनांकडून याबद्दलची मागणी रेटण्यात आली आहे. मात्र काही दिवसांच्या चर्चेनंतर पुन्हा हा विषय बाजूला पडतो आणि असा एखादा अपघात झाल्यानंतर तो चर्चेत येतो. आज वाघोलीत घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा स्कूल बसच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.