Sambhaji Bhide: अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाला संभाजी भीडेंचा विरोध; म्हणाले, `ते स्मारक उभारण्याचा बेशरमपणा...`
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Arabian Sea: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये 24 डिसेंबर 2016 रोजी या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला होता.
Sambhaji Bhide Oppose Chhatrapati Shivaji Maharaj Statue Arabian Sea: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी जुन्नरमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) अरबी समुद्रातील (Arabian Sea) स्मारकाला उघडपणे विरोध केला आहे. जाहीर भाषणामध्ये भिडे यांनी राज्य सरकारला शिव छत्रपतींचं स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नये अशा शब्दांमध्ये सल्ला दिला आहे. येथील कार्यक्रमामध्ये बोलताना संभाजी भिडे यांना अश्रू अनावर झाल्याचंही पहायला मिळालं. संभाजी भीडेंनी शिवजयंती हिंदू तिथीनुसारच साजरी केली जावी असंही यावेळेस म्हटलं.
हिंदू तिथीप्रमाणे साजरी करा जयंती
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर येथे गडकोट मोहिमेच्या कार्यक्रमाममध्ये संभाजी भिडे सहभागी झाले होते. यावेळेस बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही पाश्चिमात्य कालगणनेनुसार न करता हिंदू तिथीप्रमाणे करावी असं म्हटलं आहे. "शिव छत्रपतींना इंग्लंडच्या प्रसुतीगृहातून बाहेर काढा. ते शिवनेरीला जन्मले. त्यांचा जन्मोत्सव हिंदू पंचांगानुसारच (साजरा) झाला पाहिजे," असं संभाजी भीडे म्हणाले.
स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नका
मुंबईमध्ये समुद्रकिनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही संभाजी भिडेंनी विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य आणि त्या स्मारकाचा काहीही संबंध नसल्याचं विधान करत भीडे यांनी या स्मारकाला विरोध केला. "त्यांचं (छत्रपती शिवाजी महाराजांचं) समुद्रात स्मारक बांधणार आहे. त्या स्मारकाचा आणि शिवछ त्रपतींच्या आयुष्याचा काही संबंध नाही. कोट्यवधी रुपये खर्च करणार. ते स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नका," असा सल्ला संभाजी भीडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
कंठ दाटून आला
जगाचा बाप हा हिंदुस्थान असून याचे उत्तर सारे देश देतील असे संभाजी भिडे यांनी म्हटले. भारताबद्दल बोलताना संभाजी भीडेंचा कंठ दाटून आला.
मोदींच्या हस्ते झालेलं भूमिपूजन
24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. या सोहळ्याच्यानिमित्ताने भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील १५.९६ हेक्टर बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक बांधण्याची योजना आहे.
या स्मारकाला मच्छीमारांनीही केलेला विरोध
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी ठरलेली जागा योग्य नसून त्यामुळे ८० हजार स्थानिकांचा रोजगार धोक्यात येईल. परिसरातील समुद्री जीवांना धोका उत्पन्न होईल, अशी भूमिका घेत ‘अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती’ने या स्मारकाला विरोध दर्शविला होता. स्मारकाच्या नियोजित स्थळी समुद्रात चाळीस एकरचा खडकाळ भाग असून माश्यांसाठी नैसर्गिक खाद्य मिळणारी व त्यांच्या प्रजननास योग्य अशी ही जागा असल्याचा मच्छीमारांचा दावा होता. प्रवाळ (कोरल), ‘सी फॅन’ आणि ‘स्पाँज’ या ‘शेड्यूल्ड’ समुद्री जीवांचे आणि डॉल्फिन्ससारख्या जीवांचेही या परिसरात वास्तव्य आहे, असे मच्छिमारांकडून सांगण्यात आले होते.