औरंगाबाद : औरंगाबाद येथील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी एक मोठं विधान केलंय. संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीच्या कामावर विश्वास व्यक्त करत ते सोबत काम करणार असल्याचं त्यांनी मान्य केलंय असं देशमुख म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीराजे छत्रपती हे आझाद मैदान येथे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आम्ही सर्वांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांच्या सर्व मागण्या साधारणतः मान्य केल्या.


मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी आपलं आमरण उपोषण सोडलं. त्यावेळी संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराला पसंती दिली. विश्वास व्यक्त केला आणि एकत्र काम करण्याची ग्वाही दिली, असं अमित देशमुख म्हणाले.


मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजे यांनी जे आंदोलन केलं. त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या. त्यांच्या मागण्या महाविकास आघाडी सरकारने मान्य केल्या. त्याला मंजुरी दिली. तर, या ज्या मागण्या आहेत त्याला अंतिम स्वरुप येईपर्यंत एकत्र काम करण्याची त्यांनी भावना व्यक्त केली त्याचा हा संदर्भ आहे, असं स्पष्टीकरणही अमित देशमुख यांनी यावेळी दिलं.