आई-वडील करतात मोलमजुरी; साताऱ्याच्या पठ्ठ्याची टोकियो ऑलिम्पिकपर्यंत गगन भरारी
मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांची मान प्रवीणनं अभिमानानं उंचावली! पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही साताऱ्याच्या पठ्ठ्याचं केलं कौतुक
तुषार तपासे, क्रांती कानेटकर, झी मीडिया सातारा: अवघ्या महाराष्ट्राची मान उंचावेल आणि शिरपेचात अभिमानाचा तुरा लावणाऱ्या साताऱ्याच्या पठ्ठ्याची टोकियो ऑलिम्पिकमध्ये निवड झाली आहे. नुकतंच त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक देखील केलं आहे. या प्रवीणचा टोकियोपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याचा हा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे या छोट्याशा गावातील प्रवीण रमेश जाधव याची जपान टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आर्चरी विभागात निवड झाली. एका सामान्य कुटुंबातील प्रवीणच्या यशाने गावात आनंदाचे वातावरण आहे.
प्रवीणला अगदी लहानपणापासून आर्चरीची आवड होती. वयाच्या अवघ्या 12 किंवा 13 व्या वर्षी त्याच्यातील ही आवड हा स्पर्क पहिल्यांदाच सर्वांसमोर आला. इयत्ता चौथीमध्ये असल्यापासून तो आर्चरी या खेळ प्रकार शिकत होता. पुढे क्रीडा प्रभोदनीमधून औरंगाबाद नंतर पुणे आणि दिल्ली या ठिकाणी त्याने आर्चरीचे प्रशिक्षण घेतलं.
प्रवीण जाधवची घराची परिस्थिती खूपच बेताची असून आई शेतमजूर आणि वडील देखील सेंटरिंगच्या कामावर रोज जातात. रोज काम केल्या शिवाय त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही अशी बिकट परिस्थिती असताना देखील प्रवीण जाधवने कष्ट आणि जिद्द उराशी बाळगली. देशासाठी खेळण्याचं स्वप्न आणि एकच ध्येय समोर ठेवून वाटचाल करत राहिला.
पंतप्रधान म्हणाले की टोकियोला जाणाऱ्या ऑलिम्पिक संघात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांचे आयुष्य खूप प्रेरणा देणारं आहे. प्रवीण जाधवचं मोदींनी कौतुक केलं. प्रवीण जाधव हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गावचा आहे. तो उत्तम तिरंदाजी करणारा खेळाडू आहे. त्याचे पालक कुटुंब चालविण्यासाठी मजुरीचं काम करतात आणि आता त्यांचा मुलगा टोकियोला पहिला ऑलिम्पिक खेळण्यासाठी जात आहे. केवळ त्याच्या पालकांनाच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे. प्रवीणची ही गगनभरारी आणि त्याचा हा प्रवास फार प्रेरणादायी आहे. तो पहिल्यांदाच टोकियो ऑलिम्पिक खेळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्याचं खूप कौतुक केलं आहे.