सांगली: बापजन्मात मी कोणताही गुन्हा केला नाही. तरीपण सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) माझ्यावर गुन्हा दाखल केला. ईडीला काय चौकशी करायची ती करू दे, लय बघितलेत असले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ते मंगळवारी इस्लामपूर येथे जयंत पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणात विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मी शिखर बँकेचा संचालक किंवा सभासद नसताना ईडीने माझ्यावर गुन्हा नोंदवला. ईडीच्या नावाने काय कारवाई करायची ती करा, आम्हाला त्याची चिंता नाही. अशा खूप कारवाया पाहिल्या असल्याचे पवार यांनी म्हटले.  


राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज शक्तीप्रदर्शन करत निवडणुकीचा अर्ज भरला. यानंतर झालेल्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. त्यांनी म्हटले की, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी भाजपकडून नेहमी भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला जातो. हे सरकार कष्टकरी आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही.


अनेक मोठ्या उद्योगपतींनी कर्ज थकवल्यामुळे बँका बुडाल्या. त्यामुळे केंद्र सरकारने बँकांना ८६ हजार कोटींचा निधी दिला. मात्र, सगळ्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा लोकांच्या हातात पुन्हा सत्ता देणार का, असा सवाल पवारांनी विचारला. 


सरकार देशासमोरील खऱ्या समस्यांवर बोलायला तयार नाही. काश्मीरमध्ये ३७० अनुच्छेद रद्द केले, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र, त्यामुळे काश्मीरमधील उद्योग आणि व्यापार ठप्प झाला आहे. काश्मीरमध्ये शांतता नव्हे तर स्मशानशांतता असल्याची टीकाही यावेळी पवारांनी केली.