काही पोलीस अधिकारी गेल्या पाच वर्षातील खाल्ल्या मिठाला जागत आहेत; हसन मुश्रीफांचा टोला
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियोजित बदल्या पुढे ढकलण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शनिवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत केला. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीस यांच्यावर तात्काळ पलटवार करण्यात आला.
पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरू, फडणवीसांचा गंभीर आरोप
यंदा कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या नाहीत, असे ठरले होते. मात्र, काही पोलीस अधिकारी गेल्या पाच वर्षात खाल्लेल्या मिठाला जागत आहेत. त्यामुळे हे अधिकारी आमदारांचे ऐकत नाहीत. त्यामुळेच १५ टक्के पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चौकशी करण्याची भाजपची मागणी म्हणजे 'सौ चुहे खा के बिल्ली चली हजको', असा प्रकार असल्याचा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला.
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा गोंधळ
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. गणेशोत्सव काळात पोलिसांवर कामाचा ताण असल्याने बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत सरकारवर गंभीर आरोप केले होते. सरकारचा बदल्यांचा निर्णय अनाकलनीय आहे. बदल्यांमुळे सरकारला आर्थिक भुर्दंड पडत असल्यामुळे बदल्यांची गरज नव्हती. तसेच मला चुकीच्या बदल्या करायला सांगितल्या तर मी त्या करणार नाही. गरज पडली तर नोकरी सोडून देईन, अशी भूमिका राज्याच्या पोलीस महासंचालकांनी घेतल्याची चर्चा असल्याचे फडणवीसांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले होते. त्यामुळे हा वाद आता तापण्याची शक्यता आहे.