सांगली : खरं तर आज कुठलाही सण नसताना त्या गावातलं वातावरण एखाद्या सणासारखंच होतं. गावकऱ्यांनी आपापल्या घरासमोर गुढ्या उभारलेल्या. दारांना तोरणं लावून आरतीचे ताट घेऊन सर्जा-राजाची ओवाळणी सुरु आहे असं चित्र आज दिसत होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे चित्र होत सांगलीतल्या कवठेमंहाकाळ तालुक्यातील नांगोळे गावातलं. कोरोनामुळं राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले होते. त्या निर्बंधाच्या कचाट्यात सापडून बैलगाडा शर्यतही बंद करण्यात आलेली. 
 
बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीनंतर राज्य सरकारनं बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली अन सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेऊन नांगोळे गावात राज्यातील पहिलीच बैलगाडा शर्यत पार पडली.


याच बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं गावातील घरं सजली होती. शर्यतीत सहभागी झालेल्या आणि शर्यत पहायला आलेल्यांचे स्वागत करायला गावकरी सज्ज झाले होते. नांगोळे गावाला पहिल्या शर्यतीचा मान मिळाल्यानं गावात उत्साहाचं वातावरण होतं. 


40 बैलगाडा मालक या शर्यतीत सहभागी झाले होते. नांगोळे गावकऱयांनी बैलगाडी मालकांचं सहर्ष स्वागत केलं. शर्यतीसाठी आलेल्या बैलांची शारीरिक सक्षमता चाचणी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतरच या शर्यतीत त्यांना सहभागी करून घेण्यात आलं. 


जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व नियम, अटी पाळून ही शर्यत घेण्यासाठी परवानगी दिली होती. या शर्यतीसाठी 26 नियम देण्यात आले होते. त्या नियमांच्या आधारेच या शर्यती घेण्यात आल्या. एकाचवेळी ४० बैलगाडाच्या शर्यतीचा हा थरार पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले होते.