पुणे: स्त्री हक्क चळवळीतील लेखिका आणि महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे गुरुवारी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांची ओळ्ख होती. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले होते. तसेच रुढी, परंपरा यांच्यावर कडाडून प्रहार करत त्यांनी स्रियांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला. विद्याताईंनी स्त्री या मासिकात २२ वर्षे पत्रकार कार्यकर्ता म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी ‘नारी समता मंच’ची स्थापना केली. पुढच्या टप्प्यात स्त्री आणि पुरूष यांच्यातील संबंधांची नवी मांडणी करणारे ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर ‘सखी मंडळा’ची स्थापनाही केली.  तब्बल ३० वर्षे त्यांनी या मासिकाचे संपादकपद भुषविले.


त्यांच्या निधनामुळे सामाजिक वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. विद्याताईंचे संपूर्ण आयुष्य हे स्त्रीवादी विचार आणि कृतींनी भरले होते. एकीकडे स्वत:चा जीवनसंघर्ष सुरु असताना त्यांनी साहित्याचे भंडार निर्माण केले. त्या अगदी गावागावात आणि तळागाळापर्यंत पोहोचलेल्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनीही विद्या बाळ यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला. आम्ही अनेक चळवळीत एकत्र काम केले होते. बुद्धिप्रामाण्यवादी आणि आधुनिक विचारांच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी समाजात आधुनिक मूल्ये रुजवण्याचे काम केले, असे बाबा आढाव यांनी सांगितले.



विद्या बाळ यांचे प्रकाशित साहित्य

कादंबरी
* तेजस्विनी
* वाळवंटातील वाट

अनुवादित कांदबरी
* जीवन हे असं आहे
* रात्र अर्ध्या चंचाची


चरित्र
* कमलाकी (डॉ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र)

स्फुट लेखांचे संकलन
* अपराजितांचे निःश्वास (संपादित)
* कथा गौरीची (सहलेखिका – गीताली वि.मं. आणि वंदना भागवत)
* डॉटर्स ऑफ महाराष्ट्र * तुमच्या माझ्यासाठी
* मिळवतीची पोतडी (संपादित, सहसंपादिका मेधा राजहंस)
* शोध स्वतःचा
* संवाद
* साकव