राज्यात एवढा कडक लॉकडाऊन कशासाठी ? चंद्रकांत पाटील यांचा सवाल
राज्यातील लॉकडाऊनवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे.
कोल्हापूर : राज्यातील लॉकडाऊनवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. एवढा कडक लॉकडाऊन कशासाठी असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.
एकीकडे राज्यात रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या कोरोनाचे कारण देत पुढे ढकलल्या जातात आणि दुसरीकडे गोकुळच्या निवडणुकीला परवानगी कशी दिली जाते ? निवडणूकीचा निकाल लागल्यावर लगेच कोल्हापूर शहरात - जिल्ह्यात निर्बंध जाहीर केले जातात यावर संताप चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलने थांबवण्यासाठीच हा लॉकडाऊन असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे.
समाजातील विविध घटकांना अजूनही मदत मिळाली नसल्याचं सांगत असं गेंड्याच्या कातडीचे सरकार बघितलं नसल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
----------------------------
कोल्हापूरकर घराबाहेर पडू नका; लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. पुढील सात दिवस म्हणजेच 23 मे पर्यंत कोल्हापूरात लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
कोल्हापूरातील कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून 23 तारखेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
कोल्हापूरकरांना फक्त वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. किरणामाल, भाजीपाला दुकानेदेखील या काळात बंद राहणार आहे. जिल्ह्यात फक्त दूध विक्री केंद्र आणि दूध संकलन केंद्र सुरू राहणार आहेत.
शेतीशी संबधीत कामं सुरू ठेवण्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.