नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी एक असे जॅकेट बनवले आहे जे महिलांच्या सुरक्षेसाठी फार मोठे योगदान देऊ शकेल. 'वूमन सेफ्टी जॅकेट' असे या जॅकेटला नाव देण्यात आले असून, हे जॅकेट परिधान केलेल्या मुलगी, महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तीला जागेवर अद्दल घडणार आहे. अशा महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तिला थेट ३००० वोल्टचा धक्का बसणार आहे. इतकेच नव्हे तर, जॅकेटमध्ये फिड असलेल्या मोबाईल नंबरवर मदतीसाठी अलर्टही जाईल तसेच, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणाची माहितीही संबंधीत मोबाईलवर जाईल.


महिला सुरक्षेसाठी बनवले जॅकेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे जॅकेट मुरादाबाद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजीच्या इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगच्या पाच विद्यार्थ्यांनी बनवल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. शिवम श्रीवास्तव, राजीव मौर्य, नितिन कुमार, निखिल कुमार आणि ऋिषभ भटनागर अशी जॅकेट तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. शिवम (वय २२ वर्षे) हा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकतो. शिवमने सांगितले की, देशात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी आम्हाला एक उपकरण बनवायचे होते. खूप विचार केल्यावर आम्ही जॅकेट बनवायचा निर्णय घेतला. ज्यामुळे महिलांना अधिक सुरक्षा मिळू शकेल. हे एक उपकरण आहे. पण, ते जॅकेटसारके दिसते असेही शिवम सांगतो.


नुसते जॅकेट नव्हे, कॅमेरायुक्त जॅकेट


या जॅकेटची खासीयत अशी की हे केवळ साधे जाकेट नाही. तर, या जॅकेटमध्ये कॅमेराही असणार आहे. त्यामुळे जर कोणी व्यक्ती जॅकेट घातलेल्या महिलेची छेड काढू लागला तर, महिलेने केवळ एक बटन दाबण्याचा अवकाश. छेड काढणाऱ्याला थेट ३००० वोल्टचा झटका बसेल. तसेच, जॅकेटमध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावर अलर्टही जाईल. दुसऱ्या बाजूला जॅकेटमधील कॅमेरा परिसर आणि घटनांचे चित्रण करत जॅकेटमध्ये फिड असलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवत राहिल.


गेली सुमारे तीन वर्षे हे विद्यार्थी या उपक्रमावर काम करत आहेत. आतापर्यंत हे जॅकेट तयार करण्यासाठी १५,००० हजार रूपये खर्च आल्याची माहिती आहे. दरम्यान, बीटेक इलेक्ट्रिकलचे असिस्टंट प्रोफेसर अलोक पांडे यांनी सांगितले की, कॉलेजमध्ये रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटवर खूप ध्यान दिले जात आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचेही त्यांनी सांगितले.