मुंबई : 102 वर्षांच्या आजींनी नुकताच मुंबईत वाढदिवस साजरा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाईबाई सांगळे.....  वय वर्ष 102...वयाची शंभरी ओलांडली तरी या आजीबाई ठणठणीत आहेत. तरुणाईच्या भाषेत बोलायचं झालं तर एकदम फिट. काठी धरुन का होईना, त्या अजूनही चालतात.  स्वत:ची सगळी कामं स्वत:च करतात.  त्यांचा 102वा वाढदिवस ख-या अर्थानं अविस्मरणीय ठरला. आजींनी शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. 


नायगाव दादर इथंल्या 'नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालयात हा वाढदिवस साजरा केला.  जाईबाईंचं सगळं आयुष्य कष्टात गेलं. अगदी लहान वयात जाईबाईंचा विवाह झाला आणि त्या पतीसोबत मुंबईला रहायला आल्या. पतीला दारुचं व्यसनं असल्यानं तसा त्यांना हातभार नव्हताच. मूलं लहान असतानाच पतीचा मृत्यू झाला. मग जाईबाईंनी कित्येक वर्ष फळांचा व्यवसाय केला आणि आपल्या सात मुलांना एकटीनं हिमतीनं वाढवलं. मुलांचे विवाह झाल्यावर मग त्या नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या बोकाणी गावात राहायला गेल्या. शेतात राब राब राबल्या... भाकरी भाजीशिवाय त्यांनी इतर पदार्थांची क्वचितच चव घेतली असावी..... कदाचित हेच त्यांच्या एवढ्या प्रदीर्घ आयुष्याचं रहस्य असावं...


आजींना सात मुलं... पाच मुलगे आणि दोन मुली, आणि 12 नातवंडं, आणि आता खापर पणतू असं त्यांचं कुटुंब आहे.... आजींचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी त्यांच्या नातवानं शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत आजीचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं. आजी तशा तंदुरुस्त आहेत.... पण गेल्या चार वर्षांपासून गोळ्या घ्याव्या लागतात, म्हणून त्या तक्रारही करतात.


आजी स्वभावानं एकदम कडक... त्यांची नात-नातूच नव्हे तर अगदी आता वृद्धत्वाकडे वळलेली त्यांच्या मुलांमध्येही अजूनही आजींचा दरारा आहे. त्याचबरोबर आजीनं मेहनतीनं घरं सांभाळल्याचा त्यांना अभिमानही वाटतो. आजींना अजून दीर्घायुष्य लाभो हिच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा..