मुंबई : हृदयविकाराचं प्रमाण हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आढळतं, असा एक समज आहे. परंतु, महिलांच्या मृत्यूसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणारे कारण हे 'हृदयविकार' आहे, हे किती जणांना माहीत आहे. पुरुषांच्या तुलनेत १० वर्षे उशिरा महिलांना हृदयाच्या रक्तवाहिनीचा आजार होतो. पण त्याचे स्वरूप मात्र अधिक गंभीर असते. हृदयविकाराचा झटका आलेल्या अनेक महिलांना याबाबत माहितीच नसते.


उशिरा निदान होणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयविकार आल्यानंतरच्या पहिल्या वर्षात पुरुषांच्या तुलनेत ५०% हून अधिक महिलांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतरच्या पहिल्या सहा वर्षांमध्ये हृदयविकाराचा दुसरा झटका येण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने दुप्पट असते. 


भारतातील महिलांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षांचे असल्यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर महिलांनासुद्धा पुरुषांइतकाच हृदयविकाराचा धोका असतो. दर चारपैंकी एका महिलेला एखादा हृदयविकार जडला असल्याचे अनेक अभ्यासांती आढळून आले आहे. इंग्लंडमधील एका अभ्यासानुसार असेही आढळून आले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयविकाराचे निदान उशीरा होते. महिलांकडून कुटुंबाला नेहमी महत्त्व दिले जात असल्याने ते नेहमीच हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. 


करॉनरी मायक्रोव्हॅस्क्युलर डिसीज (हृदयातील सूक्ष्मरक्तवाहिन्यांचा आजार) हा महिलांमध्ये सामान्यपणे आढळून येतो. कथित 'ब्रोकन हार्ट सिन्ड्रोम' किंवा 'टाकोस्टुबो कार्डियोमायोपथी' हे आजारही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हा ताणामुळे उद्भवलेला कार्डियोमायोपथीचा प्रकार आहे. यात हृदयातील मुख्य स्नायू विस्फारतात.


लक्षणांकडे फारसं लक्ष न देणं


महिला आराम करत असताना किंवा निद्रावस्थेतही ही स्थिती उद्भवू शकतात. बहुधा हृदयाला नुकसान झाल्यानंतर महिला हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. कारण ही लक्षणे बहुधा हृदयविकाराच्या झटक्याशी जोडली गेलेली नसतात आणि कदाचित महिलांनी त्या लक्षणांना फार महत्त्व दिलेले नसते. हृदयविकाराशी जोडल्या गेलेल्या तीव्र वेदनेऐवजी ही लक्षणे अत्यंत सपक असू शकतात. 


महिलांकडून छातीदुखीला ताण किंवा काठिण्य म्हणून दुर्लक्ष केले जाऊ शकते. महिलांच्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या असू शकतातच, त्याचप्रमाणे या गुठळ्या हृदयाला रक्त पुरविणाऱ्या छोट्या रक्तवाहन्यांमध्येही असू शकतात. याला छोट्या रक्तवाहिन्यांचा हृदयविकार किंवा हृदयातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा आजार असेही म्हणतात.


मानसिक तणाव


मानसिक तणावामुळेही हृदयविकाराचा झटका येण्यासारखी परिस्थिती उत्पन्न होते. तुम्हाला अशी लक्षणे जाणवली किंवा हृदयविकाराचा झटका आल्यासारखे वाटले तर तातडीने वैद्यकीय मदत मागवा. तुमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असेल, शक्यतो स्वत: गाडी चालवत इमर्जन्सी रुमपर्यंत जाणे टाळा.


रजोनिवृत्तीनंतर धोका अधिक


अनेक अभ्यासाअंती असेही दिसून आले आहे की, रजोनिवृत्तीनंतर महिलांमधील हृदयविकाराच्या झटक्यांची शक्यता वाढते. रजोनिवृत्तीची प्रक्रिया साधारण ४५-५० वयादरम्यान सुरू होते. या कालावधीत महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजेन या संप्रेरकाची पातळी कमी होते. त्यामुळे हृदयविकारांमध्ये वाढ होते. एस्ट्रोजनेचा संबंध अधिक पातळीमध्ये हाय डेन्सिटी लपोप्रोटिन (एचडीएल किंवा उपकारक कोलेस्टरॉल) असण्याशी आहे. रजोनिवृत्तीनंतर नैसर्गिक एस्ट्रोजेनचे लो डेन्सिटी लायपोप्रोटिन (एलडीएल किंवा अपायकारक कोलेस्टरॉल) स्त्रवल्यामुळे उपकारक कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते आणि अपायकारक कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढते. परिणामी, हृदयविकार होण्याची शक्यता असते. 


या सवयींपासून दूर राहा 


मॉडिफायेबल (बदलता येण्यासारखे) जोखीम घटक पुरुष आणि महिलांठी सारखेच असतात. यात धुम्रपान, उच्च रक्तदाब, कोलेस्टरॉलची उच्च पातळी, मधुमेह, शारीरिक हालचालींचा अभाव, गर्भनिरोधक गोळ्या, तणाव आणि नैराश्य यांचा समावेश होतो. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि व्यायाम, आहार व औषधांचा वापर करून या धोकादायक घटकांचे नियंत्रण करा. महिलांमध्ये दिसणारी लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात हे एक आव्हान आहे. सुदैवाने, महिला ही लक्षणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतात.