मुंबई : सध्याचे जग हे स्त्री पुरुष समानतेचे युग आहे असे मानले जाते. या युगात स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहेत. पुरूषांप्रमाणेच महिलाही आपल्या सामाजिक तसेच आर्थिक बाबींचं नियोजन करतात. आर्थिक नियोजनाची सवय ही चांगली असून प्रत्येकाने ती अंगी बाणून घेतल्यास याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. बऱ्याच स्त्रिया या गृहिणी असल्याने वित्तीय नियोजन हे आपल्यापेक्षा चांगलं पुरुष करू शकतात, असा त्यांचा समज असतो किंबहुना हा समज पुरूषांचा अधिक असतो. पुरुषांइतकेच महिलांनी देखील आर्थिक नियोजनात लक्ष घातलं पाहिजे. 


 आर्थिक नियोजन गरजेचे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एका मासिकाच्या निष्कर्षानुसार, महिलांनी वेगवेगळ्या परिस्थितींनुसार व गरजेनुसार आर्थिक नियोजन करत राहणे व त्यात बदल करत राहणे आवश्यक आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असं व्यक्तिगतरित्या आर्थिक नियोजन करत राहणे गरजेचे आहे असा सल्ला हॅपिनेस फॅक्टरीचे चीफ हॅपिनेस ऑफिसर आणि फाऊंंडर अमर पंडित यांनी दिला आहे. 
 
 आर्थिक नियोजन करते वेळी आपल्याला आवश्यक असलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करून घेणे, त्याचप्रमाणे अनेक वित्तीय योजनांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, जेवढ्या लवकर सुरुवात करू तितके उत्तम. 


कमी पैसे आहेत तर नियोजन कसे - हा गैरसमज 


 कमी पैसे आहेत तर नियोजन कसे करता येईल हा गैरसमज आहे असे अमर पंडित नमूद करतात. कमी पैशांमध्ये देखील उत्तम आर्थिक नियोजन करता येते. अशा आर्थिक नियोजनामुळे भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आर्थिक अडचणींसाठी आपण तयार राहतो. ज्या महिला विवाहित आहेत, त्यांना लवकरच आपले कुटुंब वाढवण्याचा निर्णय घ्यायचा आहे, अशा महिलांनी आपले आर्थिक नियोजन करताना आपला एक ठराविक दृष्टिकोन व हेतू ठरवून त्यानुसार नियोजन करावे. 
 
 कुटुंब नियोजनामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसे की घरखर्च, मुलांच्या संगोपनासाठी लागणारी आर्थिक तरतूद तसेच त्यांच्या भविष्याविषयी योग्य ते नियोजन करणे. अशा प्रकारचे नियोजन करताना भविष्यकाळाचा विचार करणे आवश्यक आहे. एखाद्या ठिकाणी एक महिला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी करीत असेल तर त्या महिलेने नियोजनासाठी इक्विटी म्युच्युअल फंडचा विचार करण्यास हरकत नाही.


टर्म इन्शुरन्स


सध्याच्या युगात पालकांसाठी मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांच्या शिक्षणासाठी नियोजन करणे तितकेच गरजेचे आहे, अशावेळी पालकांसाठी टर्म इन्शुरन्स हा पर्याय अगदी उत्तम आहे. टर्म इन्शुरन्समध्ये दोन्ही पालकांपैकी जर पतीचे अर्थात मुलाच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यास त्यांचे भविष्य तसेच शिक्षण सुरक्षित राहते.


निवृत्तीनंतरच्या भविष्याची चिंता


 बऱ्याच महिलांना आपल्या निवृत्तीनंतरच्या भविष्याची चिंता असते, मात्र आयुष्यात प्रत्येक टप्प्यांनुसार आर्थिक नियोजन केल्यास आपला निवृत्तीचा काळ सुखकर होऊ शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना सुनियोजित आर्थिक नियोजन कसे करावे हे माहिती नसते, अशा वेळी त्यांनी एखाद्या चांगल्या वित्तीय सल्लागाराची मदत घ्यावी किंवा नियोजनाबाबत वाचन व रिसर्च करून पुढील पाऊल उचलावे. वित्तीय सल्लागार तुम्हाला नियोजन कसे करावे, गुंतवणूक कुठे आणि किती करावी, त्याचा परतावा किती येऊ शकतात, परतावा घेण्याचा योग्य काळ याबद्दल मार्गदर्शन करतो. 
 
 आजच्या युगात आर्थिक नियोजन हे फार महत्वाचे बनले आहे. यासाठी सर्वात आधी आपल्याला कशासाठी कितपत नियोजन करणे गरजेचे आहे, याचा विचार करूनच मग नियोजन करावे. आर्थिक नियोजन ही बाब अनेकांना फार किचकट वाटते. किंवा कुठल्या तरी मोठ्या गोष्टींसाठीच उदाहरणार्थ घर, शिक्षण, आजारपण यासाठी आर्थिक नियोजन करावे असा समज अनेकदा होतो. मात्र अगदी कार घेणे, भ्रमंती करणे ते रिटायरमेंट पर्यंत सर्व बाबींसाठी आर्थित नियोजन ही आता काळाची गरज आहे. तेव्हा पुरूषांप्रमाणेच पैसा कमावून त्याचे नियोजन करण्याची जबाबदारीही महिला अधिक सक्षमतेने पेलू शकतात.