उभं राहिल्याने वजन वाढण्याचा धोका कमी
अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते, असं एका संशोधनानुसार सांगण्यात येत आहे.
मुंबई : दिवसभरात सहा तास बसण्यापेक्षा उभं राहिल्याने वजन वाढण्याचा धोका कमी होतो. इतकचं नाही शिवाय अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते, असं एका संशोधनानुसार सांगण्यात येत आहे.
वजन वाढण्याचा धोका कमी होतो
बस किंवा ट्रेनमध्ये बसायला जागा नसली की, उभं राहणं आपल्या जीवावर येतं. शक्यतो आपण कोणत्याही ठिकाणी उभं राहणं पसंत करत नाही. मात्र नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.
१ हजार १८४ जणांवर अभ्यास
यासाठी संशोधकानी जवळपास १ हजार १८४ जणांवर अभ्यास केला. ३३ वयोगटातील व्यक्तींचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. यामध्ये ६० टक्के पुरुषांचा समावेश होता.
मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी
या संशोधनाच्या वरिष्ठ अभ्यासक प्राध्यापक फ्रान्सिस्को लोपेझ यांच्या सांगण्यानुसार, “उभं राहिल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. शिवाय शारीरिक हालचालीमुळे स्नायू तंदुरूस्त राहून हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. त्यामुळे उभं राहिण्याचे फक्त वजन कमी न होता इतरही फायदे आहेत.”
बसण्यापेक्षा उभं राहणं फायदेशीर
या संशोधनातून असं स्पष्ट झालं की, जेव्हा व्यक्ती उभी राहते त्यावेळी एका जागी स्थिर न राहता त्या व्यक्तीची थोडीफार शारीरिक हालचाल होते. त्यामुळे कॅलरीज बर्न होऊन वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे बसण्यापेक्षा उभं राहणं फायदेशीर ठरतं.
बसून राहण्यापेक्षा उभं राहणं फायदेशीर
संशोधकांच्या सांगण्यानुसार, आमच्या संशोधनातून असं स्पष्ट झालंय की वजन कमी करण्यासाठी एका जागी बसून राहण्यापेक्षा उभं राहणं फायदेशीर असतं.
प्राध्यापक लोपेझ पुढे म्हणाले की, “व्यक्तींनी शक्यतो अधिक तास बसणं टाळावं. उभं राहिल्याने एका प्रकारची शारीरिक हालचाल होते. जी शारीरिक आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते.” हे संशोधन युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेटींग कार्डियोलॉजीमध्ये प्रसिद्ध कऱण्यात आलंय