अमेरिकेत कोरोनाचा कहर, १ लाख ४० हजारांवर पोहोचला मृतांचा आकडा
अमेरिकेत अनेक भागात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत आहे.
मुंबई : कोरोनाचा अमेरिकेत कहर सुरुच आहे. अमेरिकेते मृत्यूंची संख्या रोज वाढत आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद अमेरिकेत होत आहे. शनिवारी अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या 140,000 वर पोहोचली. भयानक परिस्थिती अशी आहे की 50 पैकी 42 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालात हे उघड झाले आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जून महिन्यापासून दावा करीत आहेत की, कोरोनाचा प्रसार हळूहळू थांबला आहे. परंतु असे दिसून येत आहे की बर्याच ठिकाणी नवीन रुग्ण वाढत आहेत आणि संसर्ग झपाट्याने होत आहे. रॉयटर्सच्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. एका आठवड्यात सुमारे 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेच्या शेजारील देश कॅनडामध्ये कोरोना नियंत्रणात येत आहे. येथे आतापर्यंत 8800 लोकांचा मृत्यू झाला आहे.
एका आकडेवारीनुसार, स्वीडनमध्ये कोरोनामुळे जितक्या लोकांचा मृत्यू झाला आहे तितकीच नोंद अमेरिकेत एका आठवड्यात झाली आहे. स्वीडनमध्ये आतापर्यंत 5600 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिरिक्त मृतदेहांसाठी जागा उपलब्ध होत नाहीये. फिनिक्स शहरात, शवागारांच्या क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह ठेवण्यात आले आहेत. अतिरिक्त मृतदेह राखण्यासाठी टेक्सास आणि सॅन अँटोनियोमध्ये स्वतंत्र रेफ्रिजरेटर खरेदी केले जात आहेत.