लहान मुलं अनेकदा कुटुंबीयांच्या भीतीपोटी काही गोष्टी त्यांच्यापासून लपवून ठेवतात. आपण जर त्यांना सांगितलं तर उलट आपल्यालाच ओरडा किंवा मार खावा लागेल अशी भीती त्यांना असते. पण यातील काही गोष्टी इतक्या गंभीर असतात की त्या लपवणं फक्त मुलंच नव्हे तर कुटुंबांसाठीही फार महाग पडू शकतं. अशाच प्रकारे कुटुंबापासून एक मोठी गोष्ट लपवणाऱ्या 13 वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात तडफडत तिचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की या 13 वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. पण मुलीने कुटुंबीयांना ही गोष्ट सांगितलीच नाही. आपण जर घऱी सांगितलं ते नाराज होती अशी मुलीला भीती होती. फिलिपाईन्स येथे ही घटना घडली आहे. जमायका स्टार सेरास्पे असं या मुलीचं नाव आहे. रेबीजमुळे तिला आपला जीव गमवावा लागला आहे. मुलगी शाळेतून घरी जात असताना हा प्रकार घडला. रस्त्यात एका भटक्या कुत्र्याने तिचा चावा घेतला होता. 


मिरर युकेने दिलेल्या रिपोर्टनुसार, कुत्र्याने चावा घेतल्याने तिच्या शरीरावर खूण दिसत होती. कुटुंबाने याबाबत विचारणा केली असता तिने तार लागल्याचं सांगितलं. यामुळे कुटुंबीयही तिला डॉक्टरकडे घेऊन गेले नाहीत. फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला होता. पण दोन महिन्यांनी तिची प्रकृती अचानक बिघडू लागली. रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, तिने आपल्या आईला सगळा घडलेला प्रकार सांगितला. डॉक्टरांनी तिच्या शरिरात रेबिजची लक्षणं दिसू लागली होती. एप्रिलमध्ये ही लक्षणं दिसण्यास सुरुवात झाली होती. प्रयत्न करुनही तिच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती. 


जमायकाची आई सांगते की, "मी माझ्या मुलीचा मृत्यू स्विकारु शकत नाही. तिचं अचानक जाणं आम्हाला फार त्रास देणारं आहे. मी पाणीही पिऊ शकत नसल्याचं तिने सांगितलं होतं. फेब्रुवारीत कुत्र्याने चावा घेतला असल्याने आपल्याला रेबिज झाला असावा असं ती सांगत होती. मी तिला तू तेव्हाच का सांगितलं नाहीस अशी विचारणा केली होती. त्यावर तिने माझी  माफी मागितली होती. मी तिला आम्ही नाराज नाही पण आधीच उपचार करु शकलो असतो असं सांगितलं. मी मरणार आहे का अशी विचारणा तिने केल्यानंतर मी फार घाबरली होती".


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कुत्र्याने जमायकाचा चावा घेतला तो फेब्रुवारी महिन्यातच अन्य 7 लोकांनाही चावला होता. रोजलीन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अन्य पालकांना आवाहन केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "जर तुमच्या मुलांच्या वागण्यात बदल दिसत असेल तर सावधान राहा. आपल्या मुलांना मांजरीने नखं मारल्यास किंवा कुत्रा चावल्यास ते गांभीर्याने घेत घरच्यांना सांगायला शिकवा. रेबिज म्हणजे मस्करी नव्हे. हे जीवघेणं आहे. तुम्हीही हे हलक्यात घेऊ नका, जेणेकरुन माझ्या मुलीला जो अनुभव आला तो इतरांना येणार नाही".


पुढे त्यांनी म्हटलं आहे की, 'पाळीव प्राण्यांच्या मालकांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या जनावरांची जबाबदारी घ्यावी. त्यांना लस दिली जाईल याची खात्री करा. अन्यथा इतरांना त्रास होईल. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. कारण इतकं होऊनही तिने शूर होण्याचा प्रयत्न केला'.