व्हेनेझुएलामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत. वेगवाने ट्रकने कार आणि बसला दिलेल्या धडकेनंतर ही अपघात झाला असल्याची माहिती देशाचे अग्निशमन प्रमुख जुआन गोन्झालेझ यांनी एएफपीला दिली आहे. धडक इतकी भीषण होती की, गाड्यांनी पेट घेतला होता. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या दुर्घटनेनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या पूर्वेकडील राजधानी कॅराकसला जोडणार्‍या ग्रॅन मारिसकल डी अयाकुचो महामार्गावर हा अपघात झाला. अपघातात कितीजणांचा मृत्यू झाला आहे याबद्दल विचारण्यात आलं असता गोन्झालेझ यांनी 'आतापर्यंत 16 आहेत,' अशी माहिती दिली. 


जोखीम व्यवस्थापन आणि नागरी संरक्षणाचे उपमंत्री कार्लोस पेरेझ अँप्युएडा यांनी याआधी 8 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. पण यावेळी त्यांनी हा आकडा वाढेल असा इशाराही दिला होता. 



पेरेझ अँप्युएडा यांनी सांगितलं आहे की, वेगवान धावणाऱ्या ट्रकने रस्त्यावर असणाऱ्या अनेक कार आणि बसला धडक दिली. या धडकेत एकूण 17 वाहनांचं नुकसान झालं. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात रस्त्यावर दोन्ही बाजूला आगीचे लोट दिसत आहे. यावरुन हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येत आहे. 


दरम्यान अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असल्याची माहिती पेरेझ अँप्युएडा यांनी दिली आहे. पण या अपघातात जीवितहानी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.