१७८ वर्षे जुन्या थॉमस कुकचं दिवाळं
कसं, ते जाणून घ्या....
मुंबई : एकिकडे जागतिक पातळीवर पर्यटन व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच जवळपास १७८ वर्षांहून अधिक काळापासून पर्यटकांना पर्यटन सेवा पुरवणाऱ्या थॉमस कुक या प्रसिद्ध आणि नावाजलेल्या कंपनीचं दिवाळं निघालं आहे. ज्याचा परिणाम ६ लाखांहून अधिक पर्यटांनवर झाल्याचं कळत आहे.
सध्याच्या घडीला या कंपनीकडून करण्यात आलेली सर्व तिकीटं आणि हॉटेल बुकींग रद्द करण्यात आली आहेत. खुद्द या कंपनीच्या ट्विट अकाऊंटवरुनच याविषयीची माहिती दिली.
सोमवारी या कंपनीकडून ६ लाख पर्यटकांचं बुकिंग रद्द करण्यात आलं. मुख्य म्हणजे भारतातही या कंपनीची शाखा आहे ज्याच्याशी अनेक पर्यटक जोडले गेले आहेत. पण, भारतात कार्यरत असणाऱ्या या कंपनीवर कोणताही परिणाम होणार नाही आहे.
थॉमस कुककडून देण्यात आलेल्या माहितीनुसार परदेशात असणाऱ्या जवळपास दीड लाख पर्यटकांना परत आणण्याला सरकारकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. सिव्हील एविएशन अथॉरिटीच्या माहितीनुसार थॉमस कुकच्या चार विमान सेवा कंपन्यांवरही याचा परिणाम झाल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय १६ देशांमधील जवळपास २१ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर यामुळे गदा आली आहे. एकट्य़ा ब्रिटनमध्येच ९००० जणांना नोकरीला मुकावं लागलं आहे.
१७८ वर्षे जुनी थॉमस कुक
थॉमस कुक ही जवळपास १७८ वर्षे जुनी कंपनी आहे. १८४१ पासून ती कार्यरत आहे. सध्याच्या घडीला एकूण १६ देशांमध्ये कंपनीचा विस्तार झाला आहे. पण, अनेक आर्थिक अडचणींमुळे आता मात्र कंपनीसमोर मोठं आव्हान आहे. १२५ कोटी पाऊंडचं कर्ज असल्यामुळे आता या कंपनीकडून पुढे काय पावलं उचलली जाणार याकडे उद्योग, व्यवसाय क्षेत्रासह साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे.
लाईव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार थॉमस कुक इंडियाचा ७७ टक्के भाग हा २०१२ मध्येच कॅनडा येथील फेअरफॅक्स फायनॅन्शिअल होल्डिंगने खरेदी केला होता. परिणामी थॉमस कुक इंडियाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचं या कंपनीकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे.