खार्टूम : सुदानमध्ये कारखान्यात लागलेल्या आगीत १८ भारतीय मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जण अजूनही बेपत्ता आहेत. फॅक्टरीबाहेर गॅस टँकरचा स्फोट झाल्याने मोठी आग लागली. या आगीत या मजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अनेक मृत कामगारांच्या शरीराचा कोळसा झाला आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. आफ्रिका खंडातील सुदान या देशात एका सिरॅमिक कारखान्याला आग लागली आहे. दरम्यान, एलपीजी टँकरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. भारताने सुदान सरकारकडून दुर्घटनेची माहिती मागविली असून मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुदानची राजधानी खार्टूममधल्या एका टाईल्सच्या फॅक्टरीबाहेर गॅस टँकरचा स्फोट झाला आणि आग लागली. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की गॅस टँकरही हवेत उंचावर उडून दूरवर जाऊन पडला. त्यावेळी फॅक्टरीमध्ये ६८ भारतीय कामगार होते. त्यांच्यापैकी १८ जणांचा मृत्यू झालाय. तर १६ जण अजूनही बेपत्ता आहेत. खार्टूम शहराच्या बाहरी भागात हा कारखाना होता. या कारखान्यात शंभरहून अधिक भारतीय कामगार काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. स्फोट झाला तेव्हा ६० पेक्षा जास्त कामगार काम करीत होते. यापैकी १८ भारतीय होते. तर पाच स्थानिक होते. तर ३४ भारतीय कामगार या दुर्घटनेतून बचावले आहेत. त्यांना नजीकच्या सलोमी सिरॅमिक कारखान्यात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत.


आगीपासून बचाव करण्यासाठी कामगारांना सुरक्षासाधने पुरविण्यात आली नव्हती. तसेच कारखान्यात आग विझवणारी यंत्रणाही कार्यरत नव्हती, असे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. सुदान सरकारने सखोल चौकशीचा आदेश दिला असून १५ दिवसात अहवाल मागितला आहे. स्फोट झाला तेव्हा कारखान्यात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील पदार्थांचा साठा होता. या साठय़ाने पेट घेतल्याने दुर्घटनेची तीव्रता वाढली. ज्या एलपीजी टँकरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडली तो कशासाठी मागविण्यात आला होता, याबद्दल कोणतीही प्राथमिक माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.