बॉम्बस्फोटानंतर Pakistan मध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला, 25 दहशतवाद्यांचा पोलीस स्थानकावर अंदाधुंद गोळीबार
पाकिस्तानात बॉम्बस्फोटानंतर खळबळ माजलेली असतानाच सशस्त्र 20 ते 25 दहशतवाद्यांनी एका पोलीस स्थानकावर हल्ला केला. दरम्यान पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं असता दहशतवाद्यांनी पळ काढला.
Terrorist Attack in Pakistan: आर्थिक स्थिती खालावली असल्याने आधीच पाकिस्तान चिंतेत असताना दुसरीकडे दहशतवाद देशाचं कंबरडं मोडत आहे. पेशावरमधील मशिदीत दहशतवादी हल्ला झाला असल्याने आधीच खळबळ माजलेली असताना आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी यावेळी एका पोलीस स्थानकाला लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियांवाली (Mianwali) जिल्ह्यात मंगळवारी रात्री एका पोलीस स्थानकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र 20 ते 25 दहशतवाद्यांना एका पोलीस स्थानकावर हल्ला केला. मात्र पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला.
पाकिस्तान पोलिसांनी दहशतवाद्यांचा हल्ला परतून लावला. पंजाब प्रांतातील पोलिस महानिरीक्षक उस्मान अन्वर यांनी दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल पोलीस स्थानकाचे एसएचओंचं अभिनंदन केलं आहे. हल्ल्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.
सोमवारी मशिदीत स्फोट झाल्याने खळबळ
पाकिस्तानमध्ये सोमवारी मशिदीत स्फोट झाल्याने खळबळ माजली आहे. स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. रिपोर्टनुसार, हल्ल्यातील मृतांची संख्या 90 वर पोहोचली आहे. मलब्याखाली अजून काही मृतदेह असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्फोटात 150 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जखमी आणि मृतांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
स्फोट झाला तेव्हा मशिदीत नमाज पठण केलं जात होतं. स्फोट इतका मोठा होता की, मशिदीचं छत कोसळलं आणि सर्वजण त्याखाल दबले गेले.