फेसबुकसाठी 2019 वर्षे धोक्याचे ? पाहा काय झालंय
फेसबुकसाठी 2019 वर्षे वाईट असणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
नवी दिल्ली : फेसबुकवर खाजगी माहिती लीक केल्याचा ठेपका काही दिवसांपूर्वीच लागला होता. याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला अमेरिका सिनेटच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. फेसबुकने आपली चूक मान्य करत पुन्हा असे होणार नाही असे आश्वासनही दिले. पण असं असलं तरी फेसबुक बद्दल लोकांच्या मनात संशयाचे घर निर्माण झाले आहे. दरम्यान फेसबुकसाठी 2019 वर्षे वाईट असणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
पुढच्या 12 महिन्यांच्या काळात फेसबुकवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. फेसबुकविरुद्ध तपास सुरू असल्याचे आयरलॅंडच्या डेटा प्रोटेक्शन समितीने डिसेंबरमध्ये सांगितले होते. फेसबुकवर युझर्सची माहिती सुरक्षित नसल्याचे अनेक देशांनी सांगितले आहे. अशा प्रकारचा गोंधळ रोखण्यासाठी पर्याय शोधावे लागतील असे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्रायवेसी प्रॅक्टीशनर्स (आयपीपी) च्या कॅट कॉलेरी यांनी सांगितले.
दंडात्मक कारवाई
जर कंपनीची चूक असेल तर त्यांच्या जागतिक कमाईतील 4 टक्के हिस्सा दंड म्हणून वसूल केला जाईल असे युरोपीय संघाचे जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर) ने सांगितले. अशाप्रकारे दंडात्मक कारवाई झाली तर 150 कोटी अमेरीकी डॉलरचा भुर्दंड फेसबुकला पडू शकतो. आयरलॅंडच्या शोध समिती सोबतच अमेरिकेच्या फेडरल ट्रेड समिती ( एफसीटी) ने देखील 2011 मधील एका प्रकरणी फेसबुकची चौकशी करत आहे. कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यापूर्वी आम्ही युजर्सची परवानगी घेऊ असे फेसबुकने म्हटले होते. असं वारंवार सांगूनही फेसबुककडून याचे उल्लंघन झाले होते. समितीच्या निदर्शनात हे आले तर फेसबुकवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. फेसबुक जर यामध्ये दोषी आढळले तर प्रत्येक युजर्समागे 40 हजार अमेरिकी डॉलर दंड त्यांना द्यावा लागेल. एवढंच नव्हे, अमेरिकेत 8 कोटी फेसबुक युजर्स आहेत. या हिशोबाने फेसबुकवर एकूण 300 कोटी अमेरिकन डॉलरचा दंड लागू शकतो.