पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठा हल्ला झाला आहे. सशस्त्र हल्लेखोरांना 23 प्रवाशांना बसमधून खाली उतरवून गोळ्या घातल्या. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनी, डॉनने दिलेल्या वृत्तानुसार बलुचिस्तानच्या मुसाखाइल जिल्ह्यात आज सकाळी ही घटना घडली. येथे सशस्त्र हल्लेखोरांना ट्रक आणि बसमधून प्रवाशांना खाली उतरवलं आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लोकांची ओळख पटवून नंतर त्यांना गोळी घालण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसाखाइलचे सहाय्यक आयुक्त नजीब काकर यांनी सांगितलं आहे की, सशस्त्र हल्लेखोर राराशम परिसरातील इंटर स्टेट हायवेवर पोहोचले आणि नंतर रस्ता अडवला. यानंतर त्यांनी बस आणि ट्रक थांबवत त्यातील प्रवाशांची ओळख पटवण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी पंजाब प्रांतातील प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार केलं. 


नजीब काकर यांनी पुढे सांगितलं की, हल्लेखोरांनी 10 गाड्यांना आग लावली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवले. मृतांमधील तिघे बलुचिस्तान आणि इतर सर्वजण पंजाबचे होते. 


एप्रिलमध्ये 9 मजुरांची हत्या


य़ा हल्ल्याने चार महिन्यांपूर्वी बलुचिस्तानच्या नोशकीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या आठवणी ताजा केल्या आहेत. त्यावेळी 9 प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं होतं. त्यांचं ओळखपत्र तपासल्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. याआधी गतवर्षी ऑक्टोबरमध्ये हल्लेखोरांनी बलुचिस्तानच्या केच जिल्ह्यातील तुरबतमध्ये पंजाबमधील 6 मजुरांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.