बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिर तोडफोडीनंतर 29 घरांना लावली आग
बांगलादेशमध्ये कट्टरवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केलं आहे
ढाका : बांगलादेशमध्ये (Bangladesh) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जातीय हिंसाचारादरम्यान, कट्टरवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केलं आहे. गेल्या आठवड्यात दुर्गा पूजा उत्सवादरम्यान हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी 2 हिंदू तरुणांची हत्या केली. आता हल्लेखोरांच्या एका गटाने हिंदूंची 29 घरं जाळली. बांगलादेशमधल्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार रात्री उशीरा रंगपूर जिल्ह्यातील पीरगंजच्या एका गावात हिंदूंच्या घरांना लक्ष्य करण्यात आलं.
सोशल मीडियातून पसरली अफवा
सोशल मीडियावरुन पसरलेल्या ईशनिंदेच्या अफवेनंतर बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात हिंसाचार उसळला. पीरोगंज माझीपारा भागात राहणाऱ्या एका हिंदू तरुणाने धर्माचा कथित अपमान केल्याची अफवा पसरली. यानंतर हल्लेखोरांनी या गावातील 29 घरांना आग लावली. या आगीत जिवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप नाही.
बांगलादेशच्या कोमिला, चांदपुर, चटग्राम, कॉक्स बाजार, बंदरबन, मौलवीबाजार, गाजीपूर, फेनी यासह अनेक जिल्ह्यांमध्ये हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये संघर्ष उडाला. हिंदू अल्पसंख्याकांची दुकानं आणि मंदिरांवर हल्ले केल्याप्रकरणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
बेगमगंज (Begumganj) शहरात दुर्गा पुजेच्या (Hindu festival Durga Puja) शेवटच्या दिवशी मोठ्या जमावाने इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी मंदिर समितीच्या सदस्यावर प्राणघातक हल्ला केला. तसंच मंदिराचीही तोडफोड केली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता.