पाकिस्तानात भीषण अपघात! बस आणि कार धडकेनंतर दरीत कोसळली, 30 जण जागीच ठार, 15 जखमी
Pakistan Bus Car Accident: पाकिस्तानमध्ये कार आणि बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातात 30 जण ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
Pakistan Bus Car Accident: पाकिस्तानमध्ये (Pakistan) एका प्रवासी बस आणि कारची धडक (Passenger Bus Car Accident) होऊन भीषण अपघात झाला आहे. खैबर पख्तुनख्वामधील (Khyber Pakhtunkhwa) कोहिस्तान जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि कार दरीत कोसळून 30 जण ठार झाले आहेत. तर 15 जण जखमी झाले असल्यातं वृत्त Geo News ने दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस रावलपिंडी (Rawalpindi) येथून गिलगिट येथे चालली होती. यावेळी समोरुन येणाऱ्या कारसह तिची जोरदार धडक झाली.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. तसंच मृतदेह RHC रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघात झाला तेव्हा अंधार होता, त्यामुळे बचावकार्यात फार अडथळे निर्माण होत होते असं पोलिसांनी सांगितलं आहे.
गिलगिट बल्तिस्तानचे मुख्यमंत्री खालीद खुर्शीद यांनी प्रशासन तसंच सर्व संबंधित विभागांना लवकरात लवकर बचावकार्य पूर्ण करण्याचं आणि जखमींना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा आदेश दिला आहे. तसंच योग्य समन्वय साधण्यासाठी आणि महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष कंट्रोल रुम स्थापन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रशासनाला जखमींना योग्य वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही अपघातात मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला असून आपण कुटुंबांच्या दुखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानात रस्ते अपघात होणं सामान्य गोष्ट झाली आहे. खराब रस्ते, खराब वाहनं आणि बेदरकार ड्रायव्हिंग अपघातासाठी कारणीभूत ठरत असतं. गेल्या महिन्यात, बलुचिस्तानच्या लासबेला येथे प्रवासी कोच दरीत कोसळल्याने किमान ४१ जणांचा मृत्यू झाला होता.