मध्य-पूर्व भागातील इस्लामिक देश इराकमध्ये 300 वर्षं जुनी मशीद आणि तिची मिनार पाडण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. इराकमधील अधिकाऱ्यांना बसरा शहरात एका महत्त्वाच्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी मशीद उद्ध्वस्त केली. अबू-अल खासीबचं रुंदीकरण करण्यासाठी ऐतिहासिक अल-सिराजी मशीद आणि तिची मिनार पाडण्यात आल्याने स्थानिक नाराज झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इराकच्या अधिकाऱ्यांच्या या कृत्यामुळे स्थानिक लोक फार नाराज आहेत. त्यांनी इराकच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. 


1772 मध्ये बसरा शहरात अल-सिराजी मशीद उभारण्यात आली होती. ही मशीद इराकच्या प्रमुख ऐतिहासिक स्थलांमध्ये गणली जात होती. आपल्या स्थापत्यशैलीमुळे ही मशीद प्रसिद्ध होती. या मशिदीची मिनार मातीच्या विटांपासून उभारण्यात आली होती. मात्र इतक्या वर्षांनंतरही ती पूर्पणणे चांगल्या स्थितीत होती. 


मशीद आणि मिनार पाडण्याचं प्रकरण कोर्टात जाणार


रिपोर्टनुसार, मशीद आणि मिनार पाडल्याप्रकरणी आपण कोर्टात जाणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं आहे. मंत्रालयाने सांगितल्यानुसार, ''आम्हालाही विकास हवा असून, त्याच्या बाजूने आहोत. विकास व्हावा या लोकांच्या इच्छेचा आम्हीदेखील सन्मान करतो. पण यासाठी कोणत्याही धार्मिकस्थळ किंवा रहिवासी इमारतीचं नुकसान करण्याच्या विरोधात आहोत, ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे".


अल-सिराजी मशीद आणि तिचे 1900 चौरस मीटर क्षेत्रफळ सुन्नी धर्माच्या मालकीचे आहे, सांस्कृतिक मंत्रालयाने इराकच्या सुन्नी आणि शिया धर्मियांना ऐतिहासिक मशीद पाडल्याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. पण बसराचे गव्हर्नर असद अल-ईदानी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना मशीद आणि मिनार पाडण्याआधी सुन्नी वक्फ बोर्डाला माहिती देण्यात आल्याचं सांगितलं आहे. 


"मिनारला हाताने काळजीपूर्वक तोडायला हवं होतं"


दरम्यान, सुन्नी धर्मियांचं म्हणणं आहे की, आम्ही मशीद पाडण्यावर सहमती दर्शवली होती, पण विटांनी उभारलेली मिनार पाडण्यास नाही. जर मिनार पाडायची होती तर काळजीपूर्वक तोडायला हवं होतं. तिला भविष्यातील पिढीसाठी सुरक्षित ठेवायला हवं होतं. 


मशिदीमुळे होत होती वाहतूक कोंडी


बसराच्या स्थानिक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मशीद अशा ठिकाणी होती जिथे वाहतुकीची कोंडी होत होती. दरम्यान या मशिदीच्या बदल्यात दुसऱ्या ठिकाणी नऊ लाख डॉलर्स खर्च करत नवी मशीद उभारली जाणार आहे. 


300 वर्षं जुन्या मिनारला पडताना पाहून स्थानिक निवासी हैराण झाले होते. हा राष्ट्रीय वारशाचा अपमान आहे असं स्थानिक म्हणत आहेत. 2017 मध्ये मोसूल शहरात इस्लामिक स्टेटने अल-हदबा मिनारला बॉम्बने उडवलं होतं. त्यांनतर इराकच्या सांस्कृतिक वारशाचं झालेलं हे फार मोठं नुकसान आहे.