आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ३२ देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन !
उद्या ११ ऑक्टोबर म्हणजेच ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन.`
नवी दिल्ली : उद्या ११ ऑक्टोबर म्हणजेच ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन.' या निमित्ताने ३२ देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतात हे कार्यक्रम राजधानी दिल्लीत होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधत स्त्रियांच्या, बालिकांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना मिळणाऱ्या हक्कांबाबत जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण कार्यक्रमांत विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मुलींना या कार्यक्रमाअंतर्गत देश-विदेशातील मान्यवरांशी संवाद साधत आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे. स्त्रियांबाबतीत होणारा भेदभाव कमी करण्याच्या तसेच प्रत्येक क्षेत्रात त्यांना योग्य संधी मिळण्याच्या दृष्टीने अनेक योजनाही या कार्यक्रमांत आखण्यात येणार आहेत.