चीनमध्ये अंगावर काटा आणणारा भीषण हल्ला झाला आहे. कार चालकाने फूटपाथवर गाडी घालून 35 लोकांना ठार केलं असून, 43 जणांना जखमी केलं आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या दक्षिणेकडील झुहाई शहरात सोमवारी संध्याकाळी हा हल्ला झाला. या घटनेनंतर चीनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी घडलेल्या घटनेची नोंद करण्यात आली होती. परंतु त्यावेळी पोलिसांनी फक्त लोक जखमी झाल्याचं सांगितलं होतं. दरम्यान घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. परंतु मंगळवारी, पोलिसांनी सांगितलं की झुहाई स्पोर्ट्स सेंटरमध्ये गंभीर आणि भयंकर हल्ला झाला. या हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे.


आरोपी चालक 62 वर्षांचा आहे. फॅन आडनाव असलेल्या 62 वर्षीय ड्रायव्हरने गेटमधून आपली छोटी एसयूव्ही आत घातली आणि शहरातील क्रीडा केंद्रात नेली. यावेळी त्यांनी स्पोर्ट्स सेंटरमधील आतल्या रस्त्यांवर व्यायाम करणाऱ्या लोकांच्या अंगावर गाडी घातली अशी माहिती पोलिसांनी निवेदनात दिली आहे. 


पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा चालक स्वत:ला चाकूने दुखापत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आढळलं. पोलिसांनी त्याला तात्काल अडवलं आणि जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. आरोपीने आपला गळा आणि शरिरावरील इतर भांगावर जखमा करुन घेतल्या असल्याने सध्या कोमात आहे. जोपर्यंत त्याला शुद्ध येत नाही तोपर्यंत चौकशी करु शकत नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. 


चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जखमी लोकांवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केलं आहे. तसंच कायद्यानुसार गुन्हेगाराला शिक्षा दिलं जावं अशी सूचना केल्याचं शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. बीजिंगच्या नागरी आणि लष्करी एरोस्पेस क्षेत्राचे प्रदर्शन करणारा चीनचा सर्वात मोठा एअर शो त्याच शहरात आयोजित करण्यात आला आहे.