काबूल ताब्यात घेतल्याच्या 48 तासांनंतर तालिबानचा इरादा स्पष्ट, मुल्ला बरादर याची अफगाणिस्तानात एंट्री
तालिबानी इरादा स्पष्ट झालाय. काबूल ताब्यात घेतल्याच्या 48 तासांनंतर मुल्ला बरादर याची अफगाणिस्तानात एंट्री झाली आहे.
मुंबई : काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) प्रथमच अधिकृतपणे आपला इरादा स्पष्ट केला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद (Zabihullah Mujahid) म्हणाले, त्यांचे कोणाशीही वैर नाही आणि त्यांनी आपल्या नेत्याच्या आदेशानुसार सर्वांना माफ केले आहे. मुजाहिद म्हणतात की ते लवकरच एक करार करतील ज्याद्वारे देशात इस्लामी सरकार स्थापन होईल. दरम्यान, तालिबान नेता मुल्ला अब्दुल गनी बरदार (Mullah Abdul Ghani Baradar) अफगाणिस्तानच्या कंधार (Kandahar) शहरात पोहोचला आहे.
उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केले
दरम्यान, अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला देशाचे काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले आहे. अफगाणिस्तानच्या घटनेनुसार राष्ट्रपतींची अनुपस्थिती, मृत्यू किंवा पलायन झाल्यास उपराष्ट्रपती देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती असतील, असे सालेह यांनी ट्विट केले आहे. सालेह यांनी असेही म्हटले आहे की ते अजूनही देशाच्या आत आहेत आणि कार्यवाहक अध्यक्ष आहेत. इतर नेत्यांकडून पाठिंबा मिळत आहे.
दूतावास पूर्णपणे सुरक्षित
दुसरीकडे, तालिबानचे (Taliban) प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद (Zabihullah Mujahid) यांनी काबूलची (Kabul) सुरक्षा व्यवस्था कडक असल्याचा दावा केला आणि ते म्हणाले, तालिबानी अनेक ठिकाणी तैनात आहेत. मुजाहिद म्हणतात की परदेशी दूतावासांची सुरक्षा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे आणि ते दूतावास पूर्णपणे सुरक्षित असतील, अशी प्रतिज्ञा केली आहे. मुजाहिद म्हणाले की काबुलच्या बाहेरील भागात पोहोचण्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या सैन्याला शहरात प्रवेश करण्यापासून रोखले होते, परंतु काही लोकांनी परिस्थितीचा गैरवापर करून लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न केला. पण आता लोकांना सुरक्षित वाटले पाहिजे.
महिलांबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही
मुजाहिद म्हणतात की इस्लामिक अमिरात जगातील सर्व देशांना आश्वासन देत आहे की, अफगाणिस्तानमधून कोणत्याही देशाला कोणताही धोका होणार नाही. मूल्यांवर आधारित नियम लागू करण्याचा अधिकार अफगाणिस्तानला आहे, त्यामुळे इतर देशांनी या नियमांचा आदर केला पाहिजे. तसेच इस्लामच्या आधारावर महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची वचनबद्धता व्यक्त करताना मुजाहिद म्हणाले, महिलांना आरोग्य क्षेत्र आणि गरज असलेल्या इतर क्षेत्रात काम करता येईल. महिलांबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.