Burning Train : बांगलादेशात शुक्रवारी बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. बांगलादेशची राजधानी ढाका येथे शुक्रवारी रात्री उशिरा एका ट्रेनला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या जाळपोळीत दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी घडली, ज्यावर प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने बहिष्कार टाकला होता. राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी अशांततेदरम्यान  विरोधकांनी जाळपोळ केल्याचा पोलिसांना संशय आहे. या ट्रेनमध्ये भारतीयांचाही समावशे असल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशाची राजधानी ढाक्यातील गोपीबाग भागातील बेनापोल एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी हा प्रकार घडला आहे. विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात अशांततेचे वातावरण आहे. अग्निशमन सेवेचे अधिकारी रकजीबुल हसन यांनी सांगितले की, पश्चिमेकडील जेसोर शहरातून राजधानी ढाकाकडे जाणाऱ्या बेनापोल एक्सप्रेसच्या किमान चार डब्यांना आग लागली होती.


ट्रेनमध्ये होते सुमारे 292 प्रवासी 


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 9 च्या सुमारास घडली. पश्चिम बंगालच्या सीमेला लागून असलेल्या बेनापोल शहरातून चालणाऱ्या बेनापोल एक्सप्रेसच्या चार बोगींना आग लागली होती. घटनेच्या वेळी ट्रेन ढाक्यातील कमलापूर रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली होती. आतापर्यंत आम्ही पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही शोध सुरू आहे, असे अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षणाचे प्रवक्ते शाहजहान शिकदार यांनी सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की ट्रेनमध्ये सुमारे 292 प्रवासी होते, त्यापैकी बहुतेक भारतातून घरी परतत होते. गाडी गोपीबाग परिसरात येताच पेटवून देण्यात आली.


दरम्यान, गेल्या महिन्यात, पोलीस आणि सरकारने विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ला दुसर्‍या ट्रेनला लागलेल्या आगीत चार लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. तर बीएनपीने त्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचे म्हटलं होतं. विरोधी पक्षांवर सरकारी कारवाईच्या नावाखाली चुकीचा आरोप केला जात आहे, असे बीएनपीने म्हटलं होतं. बांगलादेशमध्ये रविवारी राष्ट्रीय निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पण बीएनपी आणि इतर डझनभर पक्षांनी यावर बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निषेध मोहिमेनंतर गेल्या वर्षीच्या अखेरीस हजारो विरोधी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.