पाकिस्तानला `या` गंभीर आजाराची लागण
पाकिस्तानमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ५० हजारच्या वर गेली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ५० हजारच्या वर गेली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना यातून देशाला बाहेर काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. डेंग्यूमुळे देशभरात २५० जणांचा मृत्यू झाला आहे. जियो न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये सर्वात अधिक रुग्ण आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही शहरात मिळून कमीत कमी २५ हजार जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. इस्लामाबाद मधील केवळ दोन मोठ्या रुग्णालयातच डेंग्यूचे आठ हजार रुग्ण आढळले आहेत.
रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये कमीत कमी ३५ जणांचा मृत्यू डेंग्युने झाला आहे. शुक्रवारी रावळपिंडीच्या मोरगा शहरात आणखी एका रुग्णाचा मृत्यू डेंग्युने झाला. दोन्ही शहरातील विविध भागांमध्ये कमीत कमी ७५० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी केवळ ३५ कर्मचारी आहेत.
पाकिस्तानचे साधारण १५० सरकारी कर्मचारी डेंग्युच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या आठवड्यात कराचीमध्ये डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू झाला. यानंतर डेंग्युने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १४ झाली होती. त्यानंतर पंजाबमध्ये हजारो नागरिकांचा डेंग्यू टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.