7000 Year Old Road Discovered: आजही जगभरामध्ये समुद्राखालून जाणारे अगदी मोजकेच मार्ग आहेत. मोठमोठ्या भुयारांमधून जाणारे हे मार्ग पाहून नक्कीच थक्क व्हायला होतं. मात्र अनेक हजार वर्षांपूर्वी समुद्राखाली रस्ते होते की काय असा प्रश्न पडेल असे काही पुरावे नुकतेच संशोधकांच्या हाती लागले आहेत. दक्षिण क्रोएशियाजवळच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर पाण्यामध्ये एका रस्त्याचे आवशेष आढळून आले आहेत. भूमध्य समुद्राचा (Mediterranean Sea) भाग असलेल्या एड्रियाटीक समुद्रात हे आवशेष आढळून आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे अवशेष मागील काही शतकभरातील नसून तब्बल 7 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. 


7 हजार वर्षांपूर्वीचा रस्ता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रोएशियामधील जादार विद्यापीठातील संशोधकांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये या संशोधनासंदर्भात माहिती दिली आहे. कार्बन डेटिंग आणि पुरातत्व खात्याने केलेल्या परिक्षणामध्ये हे बांधकाम इसवी सनपूर्व 4900 वर्षांपूर्वीचं असल्याचं आढळून आलं आहे. म्हणजेच हा रस्ता 7 हजार वर्षांपूर्वी वापरता होता. सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, दक्षिण क्रोएशियाच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर ज्या ठिकाणाला एड्रियाटिक समुद्र म्हणून ओळखलं जातं तिथे हे आवशेष सापडले आहेत. समुद्रात 4 ते 5 मीटर खोलवर हे अवशेष आढळून आले आहेत.


हत्यारे, जातं अन् कुऱ्हाडीचेही अवशेष


समुद्रातील हा रस्ता क्रोएशियाच्या बेटावरील पुरातन हवार संस्कृतीशी संबंधित असल्याचं मानलं जात आहे. या रस्त्याचं बांधकाम दगडांच्या स्लॅबपासून करण्यात आलं आहे. हा रस्ता 4 मीटर रुंद आहे. प्रत्यक्षात या रस्त्याचा वापर झाला असणार असं त्याची रचना पाहिल्यावरच समजतं. मात्र एवढ्या आतमध्ये रस्त्याचे हे आवशेष कसे काय आढळून आले हा प्रश्न संशोधकांनाही पडला आहे. मात्र प्राथमिक अंदाजानुसार ज्या ठिकाणी हे अवशेष आढळले आहेत तिथे लाटांचा प्रभाव फार कमी आहे. तसेच या भागामध्ये काही बेटं फार पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. त्यामुळेच संशोधकांना या ठिकाणी रस्त्याचे हे आवशेष अगदी सहज संशोधन करताना सापडले. संशोधन करणाऱ्या टीममधील काही संशोधकांनी समुद्रामध्ये स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पहाणी केली. समुद्राच्या पाणी पातळीपासून 4 ते 5 फूटांवर सोलाइन वस्त्यांचे पुरावे असलेले रस्त्यांचे अवशेष सापडले आहेत. या ठिकाणी दगडांपासून बनवलेली छोटी हत्यारे, दगडाच्या कुऱ्हाडी आणि जात्याचे अवशेषही सापडले आहेत.



रस्त्यासंदर्भातील तर्क काय?


नवपाषाण युगामध्ये येथे हवार संस्कृती अस्तित्वात होती. या संस्कृतीमधील लोक प्रामुख्याने शेती आणि गुरे चारण्याचं काम करायचे. हे सर्व लोक लहान लहान बेटांवर आणि समुद्रकिनाऱ्याजवळच्या प्रदेशामध्ये राहायचे. याच प्रांतामध्ये सोलाइन येथे या संस्कृतीचे आवशेष यापूर्वीच आढळून आले आहेत. हा संस्कृतीमधील लोक टोळ्या टोळ्यांनी रहायचे. त्यामुळेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी असाप्रकारेच योग्य रचना असलेले आणि फार काळ टिकतील असे रस्ते बनवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.