इंडोनेशियात भूकंप आणि त्सुनामीमुळे आतापर्यंत ८३२ जणांचा मृत्यू
भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के
नवी दिल्ली : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाला शुक्रवारी एक तासाच्या अंतराने भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के बसल्यानंतर आलेल्या सुनामीत ८३२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत हजारो नागरिक जखमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर एक महोत्सव होणार होता. त्याच्या तयारीसाठी जमलेले शेकडो जण बेपत्ता झाले आहेत.
सुलावेसी या बेटापासून सुमारे ७८ कि.मी. अंतरावर समुद्रात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाची क्षमता ७.५ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे ८० किमी परिसराला सुनामीचा फटका बसला आहे. दरम्यान मदतकार्य सुरु असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे.
भूंकप आणि त्यानंतर त्सूनामी यामुळे इंडोनेशियामध्ये जखमींची संख्या वाढत आहे. रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यासाठी देखील जागा नाही. त्यामुळे त्यांच्यावर बाहेरच उपचार सुरु आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे.