ढाका : बांगलादेशमध्ये शुक्रवारी एका बोटीला आग लागून अनेकांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी माहिती देताना सांगितले की, बांगलादेशमधील सुगंधा नदीत एका बोटीला आग लागली. ज्यात सुमारे 800 लोक प्रवास करत होते. ही आग इतकी भीषण होती की काही लोकांनी यापासून वाचण्यासाठी नदीत उड्या मारल्या, त्यामुळे अनेकांचा मृत्यूही झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 40 लोकांचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ढाकाहून जाणाऱ्या एमव्ही अभिजन-10 या बोटीच्या इंजिन रूममध्ये शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 वाजता आग लागली. अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. या अपघातात 40 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती बचाव कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.


ढाकापासून 250 किमी अंतरावर असलेल्या झलकाठी जिल्ह्यात हा अपघात झाला. या दुर्घटनेत 41 जणांचा मृत्यू झाल्याचे काही टीव्ही चॅनेल्सने म्हटले आहे. मदतकार्य अजूनही सुरूच आहे.


बांगलादेशमधील मंत्री खालिद महमूद चौधरी यांनी सांगितले की, 310 प्रवाशांची यादी प्राप्त झाली आहे मात्र त्याहून अधिक प्रवासी बोटीत असतील असा अंदाज आहे. पहाटे झालेल्या अपघाताची पार्श्वभूमी आणि इतर तपशील तपासण्यासाठी तीन स्वतंत्र तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बरिसाल जिल्ह्यातील शेर-ए-बांगला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, ते सध्या 70 लोकांवर उपचार करत आहेत, तर अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, आणखी 50 जणांवर इतर आरोग्य केंद्रांवर उपचार सुरू आहेत.


तटरक्षक दल, अग्निशमन दल आणि पोलिसांचे जवान नदीत शोध मोहीम राबवत आहेत. अग्निशमन सेवेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोटीतील धुरामुळे बहुतेक लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. अनेक प्रवाशांनी बोटीतून नदीत उडी मारली पण त्यांना पोहणे माहित नसल्याने ते बुडाले.


अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, "आग लागली तेव्हा अनेक प्रवासी झोपले होते, धुरामुळे गुदमरून, भाजल्याने आणि बुडून अनेकांचा मृत्यू झाला."


या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की बोट क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात होती आणि बहुतेक लोक आठवड्याच्या शेवटी आपल्या कुटुंबियांसह सुट्टीसाठी घरी जात होते. आगीचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून 3 दिवसात अहवाल सादर केला जाणार आहे. जखमींची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. बोटीला आग लागल्यानंतर लोकांनी जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या.