11 वर्षीय नातू 130 किमी सायकल चालवत घरी पोहोचला, कारण ऐकून आजीला बसला धक्का, म्हणाला `आईने...`
Viral News: मुलाने आपण सायकल चालवताना रस्त्यांवरील बोर्ड्सची मदत घेतली असं सांगितलं आहे. तसंच आपण अनेकदा चुकीच्या रस्त्यांवर गेल्याचंही त्याने म्हटलं आहे.
Viral News: चीनमधील सोशल मीडियावर सध्या एका 11 वर्षाच्या मुलाची जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे हा 11 वर्षांचा मुलगा तब्बल 24 तास सायकल चालवत होता. South China Morning Post च्या वृत्तानुसार, मुलाने सायकलवरुन तब्बल 130 किमी अंतर गाठलं. मुलगा सायकलवरुन आपल्या आजीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. आईशी भांडण झाल्याने आजीला तक्रार करण्यासाठी मुलाने सायकलवरुन प्रवास सुरु केला होता.
सतत सायकल चालवल्याने मुलगा प्रचंड थकला होता. यानंतर तो विश्रांतीसाठी एक्स्प्रेस-वेवरील टनलमध्ये थांबला होता. यावेळी तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने मुलाला पाहिलं आणि पोलिसांना याची माहिती दिली असं वृत्त स्थानिक माध्यम Meilizhejiang ने दिलं आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाची चौकशी केली. दरम्यान, मुलाने दिलेलं कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, आईसह भांडण झाल्याने मुलगा नाराज होता. यानंतर त्याने आपल्या आजीकडे याची तक्रार करण्याचा निर्णय घेतला. Meijiang राहणाऱ्या आपल्या आजीला भेटण्यासाठी त्याने थेट सायकलवरुन प्रवास सुर केला होता.
सायकलवरुन प्रवास करताना मुलाने रस्त्यांवरील चिन्हांची मदत घेतली. मात्र यावेळी त्याने अनेकदा चुकीचं वळण घेतलं. ज्या ठिकाणी मुलगा सापडला तिथे पोहोचायला त्याला दुप्पट वेळ लागला होता. पण तो आपल्या आजीच्या घरापासून फक्त एका तासाच्या अंतरावर होता. घरातून निघताना मुलाने ब्रेड आणि पाणी घेतलं होतं. रात्री ब्रेड खाऊन आणि पाणी पिऊन तो प्रवास करत होता.
पोलीस मुलाला जवळच्या पोलीस स्थानकात घेऊन गेले होते. यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला कारने घेऊन गेले. संघ्याकाळी मुलाचे वडील आणि आजी यांनी त्याला आपल्यासोबत नेलं. मुलाच्या आईने सांगितलं की, त्याने मला आजीच्या घरी जाण्याची धमकी दिली होती. पण मला फक्त तो नाटक करत आहे असं वाटलं होतं.
सोशल मीडियावर मुलाची ही गोष्ट व्हायरल झाली असून नेटकरी कमेंट करत आहेत. काहींनी मुलाच्या आजीने आईला धडा कसा शिकवला याची उत्सुकता असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी हा मुलगा हुशार असून रात्री प्रवास करण्यास हिंमत लागते असं म्हणत कौतुक केलं आहे.